पाल सत्तरी येथील देविदास सावंत यांनी साकारला प्रकल्प : दररोज 4 टन काजू बोंडूवर प्रक्रिया : काजू उत्पादकांना दिलासा
उदय सावंत / पाल
राज्याच्या अर्ध्याअधिक भागात हे अनेक कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन म्हणून काजू उत्पादनाकडे पाहिले जाते. सुमारे चार महिन्यांचा हा हंगाम असतो. अलिकडे मजूरांची कमतरता असल्यामुळे तसेच आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेकांनी काजू बोंडूपासून दारू निर्मितीचे करणाऱ्या पारंपरिक भट्ट्या बंद केल्याचे दिसत आहेत. दरम्यान, यावर पर्याय म्हणून पाल ठाणे येथील देविदास उर्फ बंडो सावंत यांनी पारंपरिक आधुनिक तंत्रज्ञानद्वारे भट्टी उभारून फेणी व हुर्राक निर्मितीला सुऊवात केली आहे. उपक्रम हा पारंपरिक दारूभट्टी व्यावसायिकांना तसेच काजू उत्पादकांना दिलासा देणारा ठरेल.
आधुनिक तंत्रज्ञानाचा असलेल्या यंत्राद्वारे काजू बेंडू मळून त्यातून बोंडूपासून रस निर्मिती होत असते. दररोज सुमारे चार टन बोडूंचा रस काढण्यात येत असतो. गेल्या काही वर्षापासून सत्तरीतील काजू बोंडू टाकून देत असत. मात्र आता या प्रकल्पाच्या माध्यमातून बोंडू खरेदी करण्याची व्यवस्था देविदास सावंत यांनी केल्यामुळे उत्पादकांना बेंडूद्वारेही अर्थप्राप्ती होणार आहे.
कर्नाटकातून बेंडूची आयात
या मळणी यंत्रासाठी मोठ्या प्रमाणात बोंडूंची गरज आहे. यामुळे आवश्यक स्वरूपाचे बोंडू या भागातून मिळत नाही. सदर बोंडू कर्नाटकातील कणकुंबी, पारवड ,चोरला, मान चिगुळे आमटे या भागातून आणले जातात, अशी माहिती सावंत यांनी दिली. स्थानिक भागातील नागरिकांना यासाठी चांगल्या प्रकारचा दर देण्यात येत आहे. यामुळे ज्याच्याकडे बोंडू आहे त्यांनी या ठिकाणी येऊन दिल्यास त्यांना त्याचे पैसे मिळतील, असे यावेळी त्यांनी सांगितले.
पारंपरिक भट्टीला आधुनिक यंत्रणेची जोड
पारंपरिक भट्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दारू गळती होत. मात्र देविदास सावंत यांनी आपल्या पारंपरिक भट्टींना आधुनिक यंत्रणेची साथ देऊन त्यामध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न देविदास सावंत यांनी केलेले आहे. यातून मोठ्या प्रमाणात कामगाराची बचत होऊ शकते. त्याचप्रमाणे बंडूंचा रस काढण्यासाठी हायड्रोलिक जॅकचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मनुष्यबळाची मोठी गरज भासणार नाही.
हुर्राक, फेणीची मोठ्या प्रमाणात निर्मिती
पारंपरिक भट्ट्या बंद होण्याच्या मार्गावर असल्यामुळे गोवाची फेणी व हुर्राक मिळण्यास कठीण बनली आहे. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून आपण या व्यवसायात आहे. आतापर्यंत गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये चांगल्या प्रकारचे व्यवसायिक संबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी दारू गोव्याच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करणार असून त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. यासाठी वाळपई विभागीय कृषी कार्यालयाचे विभागीय अधिकारी विश्वनाथ गावस यांचे चांगले मार्गदर्शन मिळाल्याचे खास उल्लेख यावेळी त्यांनी केला.
काजू उत्पादकांना चांगली अर्थ प्राप्ती : विश्वनाथ गावस
आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून काजू उत्पादकांना चांगली अर्थ प्राप्ती होणार आहे. आतापर्यंत अनेक काजू उत्पादक बोंडू टाकत देत होते. मात्र या प्रकल्पातून या बोडुंचा खरा वापर होणार असून त्यातून चांगल्या प्रकारची मद्य निर्मिती होणार आहे. त्यामुळे उत्पादकांना चांगली अर्थ प्राप्तही होणार आहे, असे विश्वनाथ गावस यांनी यावेळी स्पष्ट केले.









