घसरणीसह निर्यात 2,271 दशलक्ष डॉलरवर पोहोचली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तीव्र स्पर्धेमुळे देशातील काजू निर्यात सप्टेंबर 2022 मध्ये 38 टक्क्यांनी घसरून 2.271 दशलक्ष डॉलर्सची झाली आहे, जी सलग 11 महिन्यांपासून घसरताना दिसते आहे. सदरची माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून काजू निर्यातीत घट होत आहे. एप्रिलमध्ये 34 टक्के, मेमध्ये 30 टक्के, जूनमध्ये 6 टक्के, जुलैमध्ये 26.62 टक्के आणि ऑगस्टमध्ये 31.5 टक्के घट झाल्याची नोंद आहे.
कर्नाटक काजू उत्पादक संघाचे उपाध्यक्ष तुकाराम प्रभू म्हणाले की, ‘विशेष कृषी आणि ग्रामोद्योग योजने’ अंतर्गत निर्यात प्रोत्साहन स्थगितीमुळेही परिणाम झाला आहे. तसेच निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अद्याप कोणतेही प्रोत्साहन नाही,’ जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे तसेच आमचे काजू व्हिएतनामच्या काजूपेक्षा चांगले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
केरळमधील काजू निर्यातदारांचे म्हणणे आहे की देशांतर्गत किमती निर्यातीच्या किमतीपेक्षा 15 टक्क्यांनी जास्त आहेत, त्यामुळे व्यापारी येथे विक्री करू इच्छितात. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत निर्यात 25.16 टक्क्यांनी घटून 11.3 दशलक्ष डॉलरवर आली आहे.
स्पर्धा ठरतेय अवघड
व्हिएतनाम व्यतिरिक्त भारतीय निर्यातदारांना टांझानिया, आयव्हरी कोस्ट यांसारख्या आफ्रिकन देशांकडूनही अवघड स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.









