फळधारणेलाही सुरुवात : यंदा उत्पादन चांगले मिळण्याची बागायतदारांना आशा
वार्ताहर/उचगाव
आंबा, काजू बागेमधून आंब्याच्या आणि काजूच्या झाडांना मोहोर भरभरून आल्याने काजू, आंबा उत्पादन चालूवर्षीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळू शकेल, अशी शक्यता शेतकरी व बागायतदारांतून वर्तविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे व बागायतदारांचे बरेचसे अर्थकारण काजू व आंबा पिकावर अवलंबून असते. चालूवर्षीच्या हंगामामध्ये, काजू, आंबा मोहोराची लागवड दिसून येत आहे. तालुक्यात काजूवर आधारित अनेक उद्योग कार्यरत असून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. तसेच चालूवर्षी मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या थंडीमुळे काजू व आंबा उत्पादनावरही याचा चांगलाच परिणाम होत आहे, असे मत शेतकरी आणि बागायतदार व्यक्त करत आहेत.
तालुक्याचा पश्चिम भाग हा आंबा-काजू पिकासाठी प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांना शेती व्यवसायाबरोबरच आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या काजू, आंबा बागांमधून मोहोर येण्यास जोरदार प्रारंभ झाला आहे. खडकमिश्रित लाल माती आणि पोषक हवामान यामुळे काजूचे पीक दरवर्षी चांगले मिळते. मात्र डिसेंबरपासून मोहोर येण्यास प्रारंभ होतो. संकरित जातीच्या झाडांना मोहोर लवकर येतो. सर्वसामान्यपणे फेब्रुवारीमध्ये फळधारणा सुरू होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून काजू हंगामाला सुऊवात होते. मार्च ते एप्रिल या काळात काजूला भर असतो.
चालूवर्षी चांगला हंगाम या पिकाला मिळत असल्याने मोहराबरोबरच फळधारणाही सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील बेळगुंदी, राकसकोप, यळेबैल, सोनोली, हंगरगा, मंडोळी, किणये, कर्ले, कुद्रेमनी, बाची, कल्लेहोळ, उचगाव, अतिवाड, बेकिनकेरे, गोजगे, मण्णूर, बसुर्ते, तुरमुरी, सुळगा अशा या संपूर्ण भागांमध्ये प्रतिवर्षी काजू, आंबा हे फळ उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतले जाते. या परिसरात जवळजवळ अनेक शेतकरी काजू, आंबा बागायतदार आहेत. त्यांना या पिकामुळे दरवर्षी हजारो ऊपयांचे उत्पन्न मिळते. कमीत कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळवून देणारे हे पीक आहे. याचे वैशिष्ट्या म्हणजे या पिकाला विशेष असा खर्च नसल्याने पडीक जमिनीतसुद्धा उत्पादन काढता येते.
यावर्षी पिकात चांगली सुधारणा
गेल्या अनेक वर्षापासून आंबा, काजू बागा घेऊन आम्ही व्यापार करतो. दरवर्षी आंबा बागातून आंब्याचे पीक भरघोस येत असते. यामुळे आंबा अन्य प्रदेशात तसेच स्थानिक पातळीवर आम्ही पुरवठा करतो. यावर्षीचे चित्र पूर्णत: चांगले असून आंबा, काजू बागेतून भरघोस मोहोर आला असून सध्या झाडांना फळधारणाही सुरू झाली आहे.गेल्या अनेक वर्षात आंबा पिकाने धुक्याचा प्रादुर्भाव, वातावरणातील बदलामुळे मोठा दगा दिला होता. त्यामानाने यावर्षी चांगली सुधारणा झाली असून सदर पिकातून काय उत्पादन मिळते हे निसर्गावरच अवलंबून आहे.
– समद ताशिलदार









