आयएएस पूजा सिंघलच्या निकटवर्तियांवर ईडीचे छापे ः 14 हून अधिक ठिकाणी कारवाई
वृत्तसंस्था/ रांची
आयएएस अधिकारी पूजा सिंघल आणि इतरांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी झारखंडच्या हजारीबाग जिह्यात छापे टाकून तीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली. मोहम्मद इझहर अन्सारी नावाच्या व्यक्तीच्या घरातून 500 आणि 2,000 रुपयांच्या चलनी नोटांची बंडल्स मोठय़ा प्रमाणावर जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. राजधानी रांचीमधील हरमू येथील ब्लू सिप्रा अपार्टमेंटसह रामगढ आणि हजारीबागमधील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. ईडीचे पथक शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत अनेक घरांची झडती घेत होते.
पूजा सिंघल यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात छापे मारताना एजन्सीने कोटय़वधींची रोख रक्कम हस्तगत केली. ईडीने पूजा सिंघलचे निकटवर्तीय समजले जाणारे कोळसा व्यापारी इझहर अन्सारी आणि अशोक कुमार यांच्या 14 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ईडीने इझहर अन्सारीच्या हजारीबाग येथील घरातून 3 कोटींची रोकड जप्त केली आहे. मनरेगा निधीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी केलेल्या कारवाईत त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या घरातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली. रांची येथील पूजा सिंघलच्या जवळच्या चार्टर्ड अकाउंटंटवर छापा टाकून 19 कोटी 31 लाख रुपये जप्त करण्यात आले. तसेच कोळसा जोडणीचा गैरवापर केल्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी झारखंड मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (जेएसएमडीसी) माजी प्रकल्प संचालक अशोक कुमार सिंह यांच्या निवासस्थानांवर आणि इतर अनेक कंपन्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले.
कारवाई झालेले इझहर अन्सारी हे कोळशाचे मोठे व्यापारी आहेत. त्याचे अनेक नेते आणि अधिकाऱयांशी संबंध आहेत. नुकतेच इझहर अन्सारी यांनी जमशेदपूरमध्ये मोठी पार्टी दिली होती. या पार्टीत राज्यातील अनेक वरि÷ अधिकारी आणि नेतेही सहभागी झाले होते. तर अशोक कुमार सिंह हे देखील पूजा सिंघलचे जवळचे मानले जातात. अशोक सिंग यांची ‘जेएसएमडीसी’मध्ये कंत्राटावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना निलंबित आयएएस पूजा सिंघल यांचे संरक्षण मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
2000 बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी पूजा सिंघल यांना गेल्यावषी 11 मे रोजी मनरेगा योजनेतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. अलीकडेच फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निलंबित अधिकारी सिंघल यांना त्यांच्या आजारी मुलीची देखभाल करण्यासाठी दोन महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट (पीएमएलए) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या दुसऱया प्रकरणातही ईडी त्याच्या भूमिकेची चौकशी करत आहे. या प्रकरणी त्यांच्यावर राज्यातील खाण क्षेत्रातील कथित अनियमिततेचा आरोप आहे.









