प्रतिनिधी/ बेळगाव
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी गाभाऱ्याबाहेरील दानपेटी फोडून रोकड पळविल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले आहे. चोरीच्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी पुजारी मंदिरात पोहोचले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. याच परिसरात असलेले गणेश मंदिरही फोडण्यात आले आहे. एक लाकडी दानपेटी फोडून त्यातील रक्कम पळविण्यात आली असून ती पेटी मंदिर परिसरातच टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.









