सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा: रविवार पेठेत बालाजी प्रेस्टिज या इमारतीत भूमिशिल्प साप्ताहिकाचे कार्यालय असून त्या कार्यालयातील फर्निचरची मोडतोड करुन टेबलमधील रोख रक्कम चोरुन नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पद्माकर सोळवंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 26 एप्रिल 2022 रोजी भूमिशिल्प या साप्ताहिकाच्या कार्यालयासाठी नितीन बजरंग जाधव (रा. शाहुपूरी) याच्याकडून बालाजी प्रेस्टिज या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील दुकान गाळा भाड्याने घेतला होता. त्याबाबतचा लिव्ह अॅण्ड लायसन्स अॅग्रीमेंट दि. 27 एप्रिल 2022 रोजी करुन दि. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2025 असे 36 महिन्याकरता दरमहा 10 हजार रुपये भाड्यापोटी गाळा घेतला होता.
मी माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने त्या मिळकतीमध्ये फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, कॉम्प्युटर, लाईट फिटींग कलर, पाण्याची व्यवस्था, लोखंडी गेट अशी व्यवस्था केली होती. तसेच भाड्यापोटी नितीन जाधव यांना दरमहा रोखीने, चेक व ऑनलाईन स्वरुपात 10 हजार रुपये प्रति महिना भाडे दिले. भाडेकरार असल्याने दि. 13 फेब्रुवारी 2025 रोजी गाळा खाली करण्याची नोटीस दि. 27 फेब्रुवारी रोजी दिली होती. त्यास दि. 29 फेब्रुवारी रोजी लेखी उत्तर दिले होते.
मला लगेच दुसरीकडे व्यवसायासाठी गाळा उपलब्ध नसल्याने सहा महिन्याची मुदत मागितली होती. त्यांनी प्रथम होकार दिला, नंतर मात्र अन्य कारणे दाखवून गाळा खाली करण्यास सांगितले. परंतु माझी दुसरीकडे व्यवस्था न झाल्याने त्यांना काही दिवस थांबण्याबाबत विनंती केली होती.
परंतु दि. 13 जून रोजी नितीन जाधव व त्यांची पत्नी व इतर 3 जणांनी गाळ्याचे सकाळी 10 वाजता विनापरवानगी अगोदरचे कुलूप काढून त्यांचे पुलूप लावले. त्यावर सोळवंडे यांनी विनंती केली. परंतु त्यांनी ऐकून न घेता दि. 20 जुन रोजी सकाळी 11 वाजता गाळ्यात शिरुन आतमधील फर्निचर, संगणक, सीसीटीव्ही आदी साहित्य बाहेर काढून टाकले व नुकसान केले. तसेच टेबलमधील सुमारे 5 हजार रुपयांची रक्कमही चोरुन नेली आहे. त्यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








