वृत्तसंस्था/ चंदीगड
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या पंजाब राज्यातील खेळाडूंसाठी मुख्यमंत्री सीएम. मान यांनी रोख रकमेची बक्षीसे जाहीर केली आहेत.
पंजाब शासनातर्फे सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला 1 कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्या खेळाडूला 75 हजार रुपये तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूला 50 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पंजाबच्या 33 खेळाडूंनी आपला सहभाग दर्शविला होता. त्यामध्ये पंजाबच्या अॅथलिट्सनी 8 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्यपदकांची कमाई केली आहे. पंजाब राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंचा लवकरच मोठ्या थाटात सत्कार करण्यात येणार असून या समारंभात रोख रकमेची बक्षीसे दिली जातील. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत पंजाबच्या खेळाडूंनी सर्वाधिक म्हणजे 19 पदकांची कमाई करण्याचा विक्रम केला आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी होण्याच्या दृष्टीकोनातून पंजाब शासनाने खेळाडूंना आर्थिक मदतही केली आहे.









