वृत्तसंस्था / मोहाली
आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे पहिल्यांदाच अजिंक्यपद मिळविणाऱ्या भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर तसेच अमनजोत कौर यांना पंजाब क्रिकेट संघटनेतर्फे प्रत्येकी 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याच भारतीय महिला क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीष बाली यांना 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
पंजाब क्रिकेट संघटनेतर्फे लवकरच एक खास समारंभ आयोजित केला जाणार असून या समारंभात पंजाबचे प्रतिनिधीत्व करणारे भारतीय संघातील कर्णधार हरमनप्रीत कौर, अमनजोत कौर तसेच क्षेत्ररक्षक प्रशिक्षक मुनीष बाली यांचा खास गौरव करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले. हरमनप्रीत कौर ही पंजाबमधील मोगा येथील रहिवासी आहे. अमनजोत कौर ही भारतीय महिला संघातील युवा अष्टपैलू म्हणून ओळखली जाते.









