वृत्तसंस्था/ लाहोर
नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत पाकिस्तानने कांस्यपदक मिळविले. त्याबद्दल संघातील प्रत्येक खेळाडूला 100 अमेरिकन डॉलर्स (सुमारे 28000 पाकिस्तानी रुपये) बक्षीस देण्यात येणार आहेत. खेळाडूंसह प्रशिक्षक व त्यांच्या साहायकांनाही हे बक्षीस मिळणार आहे.
पाकिस्तान हॉकी फेडरेशनने बुधवारी याबाबत घोषणा केली. पीएचएफचे अध्यक्ष मिर तारिक बुगटी यांनी खेळाडूंसाठी हे खास बक्षीस मंजूर केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत पाकने कोरियाचा 5-2 अशा गोलफरकाने पराभव केला होता. त्याआधी त्यांना उपांत्य लढतीत चीनकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता. भारताने ही स्पर्धा पाचव्यांदा जिंकताना अंतिम लढतीत चीनला एकमेव गोलने पराभूत केले.
खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी हे रोख बक्षीस देण्याचा उद्देश आहे. या स्पर्धेवेळी अबु बक्र मेहमूद जखमी झाला होता. त्याला सावरण्यासाठी पूर्ण पाठिंबा देणार असल्याचेही पीएचएफने सांगितले. याशिवाय संघातील एक खेळाडू गझनफर अलीला कांस्यपदक समर्पित करण्यात आले. या स्पर्धेवेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले. मात्र त्याने मायदेशी परत न येता स्पर्धा पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मानवंदना म्हणून पीएचएफने हा निर्णय घेतला.









