मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत माहिती
पणजी : पुरातत्त्व खात्यातील दस्तावेज चोरीला गेल्यामुळे जमीन हडप करण्याची प्रकरणे वाढली, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी विधानसभेत सांगितले. पुढील वर्षापासून ‘पर्पल फेस्त’ आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. समाजकल्याण खाते, पुरातत्त्व खाते आणि नदी परिवहन खात्याच्या मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. पुरातत्त्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या गैरहजेरीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मागण्यांवर उत्तरे दिली.
पुरातत्त्व खाते कदंब पठारावर नेणार
पुरातत्त्व खात्याकडे जुनी कागदपत्रे आहेत. या कागदपत्रांची जपणूक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग केल्यानंतर त्यांची जपणूक करणे सुलभ होणार आहे. खात्यासाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे. त्यापूर्वी खात्याचे कदंब पठारावर भाड्याच्या इमारतीत स्थलांतर करण्यात येणार आहे. राज्याचे वारसा धोरण वर्षअखेरीस तयार होईल. चांदोर गावाचे ऐतिहासिक महत्त्व टिकवून ठेवले जाईल. तसेच हे गाव वारसा म्हणून जाहीर होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोविड मदत योजनेचे 17 हजार अर्ज प्रलंबित आहेत. या योजनेखाली 5 हजारांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. ही मदत त्वरित मिळावी, अशी मागणी आमदार संकल्प आमोणकर यांनी केली होती.
दिव्यांगाना सोयी-सुविधा पुरविणार
दिव्यांग बांधवांसाठी 22 इमारतींमध्ये सोयी-सुविधा पुरविण्याची तयारी करण्यात आली आहे. किनारी भागात मात्र अशा सुविधा अजूनपर्यंत पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. दिव्यांग बांधवांसाठी सरकार अनेक योजना राबवित आहे. इतर राज्यांतील योजनांचाही अभ्यास करून आर्थिक मदतीचा विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अटल आसरा योजनेचा 578 जणांना लाभ
घरांसाठी आर्थिक मदत देणाऱ्या अटल आसरा योजनेवर पाच वर्षांत 1 कोटी 8 लाख ऊपये खर्च करण्यात आले आहेत. धनगर समाजातील 578 लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तरीही या योजनेपासून अनेकजण वंचित आहेत. त्यामुळे समाजकल्याण खात्यातर्फे या योजनेची जागृती करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
चोडण-रायबंदर जलमार्गावर रो रो फेरीसेवा
चोडण-रायबंदर या जलमार्गावर रो रो फेरी सेवा सुरू करण्यात येईल. काही तांत्रिक कारणामुळे सोलर फेरीसेवा सुरू होऊ शकली नाही. नवीन फेरीबोटी आणून फेरीसेवेत सुधारणा करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. या खात्यात सेलर सेवेत यावे म्हणून अॅप्रेंटिस योजनेखाली बिठ्ठोण मॅरिटाईम विद्यालयातील विद्यार्थ्यांची भरती करण्यात आली आहे.
मंत्री सुभाष फळदेसाई यांची प्रकृती बिघडली
मंत्री सुभाष फळदेसाई यांनी उत्तरे देण्यास सुरुवात केल्यानंतर अचानक त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. त्यांना बोलता येत नसल्याने सभापती तवडकर यांनी कामकाज काही वेळेसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्री फळदेसाई यांच्या गैरहजेरीत उत्तरे दिली आणि कामकाज पुढे नेले. फळदेसाई यांची प्रकृती काही वेळाने स्थीर झाली.








