जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांची टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद : व्हॅक्सिन डेपोतील झाडे तोडल्याचे कारण
बेळगाव : बेळगावचा श्वास म्हणून ओळखलेल्या व्हॅक्सिन डेपोमध्ये बेकायदेशीररित्या कामे करण्यात आली. कामे करत असताना जिल्हा आरोग्य विभागाकडून परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र त्यांच्या परवानगीविनाच व्हॅक्सिन डेपोतील झाडे तोडून विकासकामे राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आता जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटीच्या एमडीविरोधात टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. त्यानंतर एमडीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कामासाठी परवानगी नाही, कामाचा आराखडा तयार नाही. केवळ राजकीय दबावातून स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी व्हॅक्सिन डेपोमध्ये विकासकामे करण्याचा प्रयत्न केला होता. आता याप्रकरणी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीच गांभीर्याने घेतले असून याची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये स्मार्ट सिटीच्या एमडींविरोधात फिर्याद दिली आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये बेकायदेशीर कामे केली आणि झाडे तोडली म्हणून फिर्याद दिली. पोलिसांनी भा.दं.वि. 420, 427 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामुळे याप्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. वास्तविक व्हॅक्सिन डेपोमधील झाडे तोडू नयेत, यासाठी पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने स्थगिती दिली. असे असताना पुन्हा त्याठिकाणी कामे करण्यात आली. बेजबाबदारपणे ही कामे केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. एकूणच या प्रकरणामुळे बेकायदेशीर कामे केल्याचा प्रताप उघडकीस आला आहे.
व्हॅक्सिन डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती
तसेच औषधोपयोगी झाडे आहेत. या झाडांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. व्हॅक्सिन डेपोमुळे शहराला ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. असे असताना विकासाच्या नावाखाली झाडांची अक्षरश: कत्तल करण्यात आली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने स्थगितीही दिली होती. सर्वोच्च न्यायालयातही या खटल्याची सुनावणी झाली. त्याठिकाणी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी 90 हजारांपेक्षा अधिक झाडे आम्ही लावू, असे सांगितले होते. एकाही झाडाला आम्ही धक्का पोहोचू देणार नाही, असेही म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे याबाबत अनेक पर्यावरणप्रेमींनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. अखेर त्याची दखल घेऊन टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल झाली आहे.
स्मार्ट सिटीचे अधिकारी धारेवर : व्हॅक्सिन डेपोतील कामांची मंत्र्यांकडून पाहणी : दोषींवर कारवाई करणार
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्हॅक्सिन डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेताच ही कामे करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. व्हॅक्सिन डेपोमध्ये ऐतिहासिक लस संस्था होती. ही सर्व जमीन 2006 साली आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडे लक्ष न देता स्मार्ट सिटीची कामे करण्यात आली आहेत. औषधी वनस्पती असलेली झाडे तोडून हे काम करण्यात आले. यामुळे पालकमंत्री सतीश जारकीहोळी चांगलेच संतापले. स्मार्ट सिटीचे काम यापूर्वीच थांबविण्यात आले आहे. याबाबत न्यायालयातही खटला दाखल आहे. असे असताना काम करणे चुकीचे आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. स्मार्ट सिटीअंतर्गत व्हॅक्सिन डेपोमध्ये फुटपाथ, इमारतही उभारली आहे. तर 9 कोटींची कामे अद्याप बाकी असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन तोडगा काढण्याबाबतही सूचना करण्यात आली. यावेळी आमदार राजू सेठ, बाबासाहेब पाटील, मृणाल हेब्बाळकर, माजी तालुका पंचायत सदस्य निलेश चंदगडकर उपस्थित होते.









