एक्सवर खोटे वृत्त पसरविल्याचा आरोप
हैदराबाद : तेलंगणात बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव, मन्नम कृष्ण आणि कोनाथम दिलीप कुमार समवेत पक्षाच्या अन्य नेत्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कथित स्वरुपात खोटे वृत्त पसरविल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा नोंद झाला असल्याचे समजते. नलगोंडा जिल्ह्यातील नरकेबलच्या नगराध्यक्ष चौगोनी राजिया यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. बीआरएस नेत्यांनी दहावीच्या परीक्षेतील तेलगू विषयाची प्रश्नपत्रिका लीक प्रकरणात माझा सहभाग असल्याची खोटी माहिती शेअर केली होती, असे चौगोनी यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाचे सरकार केवळ शासकीय प्रक्रियांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करत आहे. सरकारने प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली नाही, परंतु केटीआर आणि अन्य नेत्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्याची तत्परता दर्शविल्याची टीका बीआरएस आमदार कलवकुंतला संजय यांनी केली आहे.









