ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (bachchu kadu) यांच्यावर रस्ते कामात 1.95 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर (dhairywardhan pundkar) यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती.
जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामासंदर्भातील प्रस्तावात परस्पर बदल करुन 1.95 कोटींचा अपहार केल्याची तक्रार बच्चू कडू यांच्याविरोधात दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करून कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्री लोकसेवक असल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी 90 दिवसांच्या आत राज्यपालांची परवानगी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान, वंचितच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. राज्यपालांनी कायद्यानुसार दस्तऐवज सादर करण्याचे त्यांना सांगितले. राज्यपालांनी नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले होते. त्यानुसार चौकशी होऊन या प्रकरणात शहर कोतवाली पोलिसांनी कडू यांच्या विरोधात भादंवि कलम 405, 409, 420, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहे.