मारहाणीत पडला होता खाडीपात्रात ; संशयित ५ जणांवर गुन्हा दाखल
मालवण / प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील रेवंडी खाडी किनारी उभे असलेल्या वाळू काढणाऱ्या बोटीवर काम करणाऱ्या पाच कामगारांवर छोट्या बोटीच्या सहाय्याने येऊन हल्ला करून त्यांना मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या हल्ल्यात एक कामगार जखमी अवस्थेत खाडीपात्रात पडला होता. त्या कामगाराचा गेले दोन दिवस शोध घेण्यात येत होता. त्याचा मंगळवारी सकाळी शेल्टी खाडी किनारी मृतदेह सापडून आला. पोलिसांनी याप्रकरणी तळाशील येथील पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून यातील दोघांची नावे निश्चित झाली असून अन्य तिघांचा शोध घेतला जात आहे. यातील एकाला आज पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.









