पुणे / प्रतिनिधी :
इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर औरंगजेबाविषयी स्टेटस ठेवून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संबंधित तरुणावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शाहरुख सय्यद असे या तरुणाचे नावे आहे. याबाबत शुभम विठ्ठल रेणगुंठा (वय 21, रा. येरवडा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार शुभम रेनगुंठा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट पाहत असताना इंस्टाग्राम खात्यावर त्यांना शाहरुख सय्यद या तरुणाने औरंगजेबाविषयी स्टेटस ठेवण्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 295 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक एस. शेलार पुढील तपास करत आहे.
देवदेवतांविषयी वादग्रस्त पोस्ट केल्याने सांगलीच्या इसमावर गुन्हा
पुणे शहरातील सदाशिव पेठ या ठिकाणी राहणारे सचित श्यामदत्त एरंडे (वय 37) हे त्यांचे फेसबुक अकाउंट पाहत होते. त्यावेळी जेट जगदीश, जगदीश काबरे, जे. के या नावाने उघडलेल्या फेसबुक खात्यावर हिंदू देवी देवतांविषयी, महापुरुषांविषयी, साधू संतांविषयी आणि भारत मातेविषयी वादग्रस्त पोस्ट करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी एका आरोपीवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश काबरे (रा. सांगली ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस पुढील तपास करत आहे.









