हिरेबागेवाडी पोलिसांनी केला सुमोटो गुन्हा दाखल
बेळगाव : सुवर्णविधानसौधमध्ये भाजपचे विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी आणि किशोर बी. आर. यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अखेर हिरेबागेवाडी पोलिसांनी दहा अज्ञातांविरोधात रविवार दि. 22 रोजी रात्री सुमोटो गुन्हा दाखल केला आहे. सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प यांनी फिर्याद दिली असून अद्याप याप्रकरणी कोणाला अटक झालेली नाही.
सुवर्णविधानसौधमध्ये कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. याकाळात भाजपचे विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याने त्यांचे समर्थक आक्रमक बनले होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गुऊवार दि. 19 रोजी दुपारी 4.15 च्या दरम्यान विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी आणि किशोर बी. आर. हे दोघेजण विधानपरिषदेच्या सभागृहाकडे जात होते. त्यावेळी अचानक त्या ठिकाणी आलेल्या दहा जणांनी त्यांना वाटेत अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यासह अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी त्या ठिकाणी तैनात असलेल्या मार्शलनी मध्यस्थी करून हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना माघारी धाडले होते.
या घटनेनंतर मोठ्या राजकीय नाट्यामय घडामोडी घडल्या. अपशब्द उच्चारल्याप्रकरणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांच्याविरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर अवघ्या काही तासात सी. टी. रवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलीस वाहनातून रात्रभर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात फिरविण्यात आले. या घटनेमुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार हंगामा झाला. सी. टी. रवी यांचा फेक एन्काऊंटर करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच आता हिरेबागेवाडी पोलिसांनी विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी आणि किशोर बी. आर. यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा अज्ञातांविरुद्ध सुमोटो गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील पुढील तपास करीत आहेत.









