सातारा :
खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर करून अभिनेता अमीर खान याला अज्ञात इसमाने मेसेज व फोन केला. मित्र भेटणार होता, कामाचे काय झाले असे बोलून काही दिवसांपासून तोतयागिरी करत होता.
याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांना कळताच त्यांनी पीए पंकज चव्हाण यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूद्ध तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार चव्हाण यांनी गुरूवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून इसमावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंकज चव्हाण यांना पाचगणी येथील मित्र अमीन यांनी फोन करून सांगितले की, महाराजांना अभिनेते अमीर खान यांना भेटायचे आहे. अमीर खान महाराजांना फोन करताहेत पण ते उचलत नाहीत, असे समजल्याने चव्हाण यांनी महाराजांना आपल्याला अमीर खान यांना भेटायचे आहे काय असे विचारले असता त्यावर महाराजांनी मला अशा कोणत्याच व्यक्तीला भेटायचे नाही असे सांगितले. त्यामुळे मी माझा पाचगणी येथील मित्र अमीन यास फोन केला असता त्याने सिनेस्टार अमीर खान यांचा पीए बॉबी यांचा नंबर मला दिला. व त्यावर खात्री करण्यास सांगितले. त्यावेळी मी सिनेस्टार अमीर खान यांचे पीए बॉबी यांना संपर्क करुन अमीर खान साहेबांना महाराजांना भेटायचे आहे काय असे विचारले असता त्यांनी मला 9422300607, 8999382890, 7775078680 या नंबरवरुन आमच्या साहेबांना मेसेज व फोन करुन मी साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले बोलतोय माझ्या मित्रास तू भेटणार होतास त्याच्या कामाचे काय झाले, तुझ्या मॅनेजरशी बोलुन घे, आणि त्याचे काम करुन दे असा मेसेज मला पाठविला. त्यावर मी सदरचे तीनही नंबर चेक केले असता ते महाराजांचे नसल्याची माझी खात्री झाल्याने पंकज चव्हाण यांनी ते नंबर ट्रूकॉलरवर चेक केले असता त्यावर छत्रपती उदयनराजे भोसले असे नाव येत असल्याचे पाहिले. त्यामुळे चव्हाण यांनी खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा केली व महाराजांच्या नावाचा वापर करुन तोतयागिरी करणारा व सिनेस्टार अमीर खान यांना फोन व मेसेज करणाऱ्या इसमाचे विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
- अमानत शेख असे इसमाचे नाव
खा. उदयनराजे भोसले यांच्या नावाने फोन करणाऱ्या इसमाविरूद्ध गुन्हा दाखल होताच पोलिसांनी माहिती घेण्यास सुरूवात केली. यावेळी अमानत शेख असे या इसमाचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा इसम कोण आहे, व कोणत्या हेतुने त्याने फोन केला याबाबत अधिक चौकशी करून तत्काळ त्याला ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
..








