खेड :
दीड लाख रुपये किंमतीचे वीज बिल थकवत विजेची चोरी केल्याप्रकरणी मधुकर कृष्णा साळुंखे याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महावितरणचे अधिकारी निखिल बेडेकर यांनी तक्रार नोंदवली. ही घटना 27 मार्च 2024 मध्ये घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मधुकर साळुंखे हा भरणे आठवडाबाजार येथे वास्तव्यास होता. वीज बिलाची रक्कम भरणा न करता वीज बिल थकवल्याप्रकरणी त्याच्यावर भारतीय विद्युत अधिनियम 2003 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याबाबत ई–तक्रार येथील पोलीस ठाण्यात 12 मार्च रोजी प्राप्त झाली होती. दरम्यान, महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याची सातारा येथे बदली झाली होती. पोलिसांकडून महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांकडून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याकरिता तक्रार देण्याबाबत पत्र धाडण्यात आले होते. त्यानुसार महावितरणचे निखिल बेडेकर यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात वीज चोरीची तक्रार नोंदवली. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.








