एकंबे :
एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्ष तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार देऊन महिलेसह तिच्या दोन्ही मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोरेगाव येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. गणेश हरिभाऊ होळ याच्याविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर 2013 सालापासून डॉ. गणेश होळ याने या महिलेबरोबर जवळीकता वाढवली. त्यानंतर महिलेबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मुलांचे पालन पोषण करावयाचे असल्याने या महिलेने लग्नास नकार दिला. त्यानंतर सातत्याने डॉ. होळ याने समक्ष भेटून आणि फोन कॉल करून माझे आणि बायकोचे पटत नाही. मी बायकोला लवकरच घटस्फोट देणार आहे, तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून गोड बोलत महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर या महिलेने लग्नास होकार दिला होता.
या महिलेचा विश्वास संपादन करून डॉ. गणेश होळ याने बायकोला द्यायच्या घटस्फोटाची सर्व कागदपत्रे तयार आहेत, असे सांगून गोड बोलत कोरेगाव येथील स्वत:च्या राहत्या घरासह महिलेच्या घरात आणि विटा व पाचगणी येथील एका हॉटेलमध्ये तसेच वाठार स्टेशन येथील एका अॅग्रो टुरिझममध्ये अत्याचार केला. लग्नाचा विषय काढल्यानंतर डॉ. होळ याने टाळाटाळ केली. त्यानंतर या महिलेबरोबर भांडण तंटा करत घडल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले अथवा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास महिलेसह मुलांना जीवे मारण्याचे धमकी दिली.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी पावणे दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक दीपिका मुसळे तपास करत आहेत.








