पोलिसांची कारवाई, नोटीस बजावून सुटका
बेळगाव : जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत म. ए. समिती नेते आणि कार्यकर्ते अशा एकूण 82 जणांना धर्मवीर संभाजी चौकातून पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सुटका केली. या प्रकरणी सरकारतर्फे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडेबाजार पोलिसांनी 78 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बेळगावात कर्नाटक सरकारचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येते. त्याला विरोध म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म. ए. समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन केले जाते.
दरवर्षी व्हॅक्सीन डेपो मैदानावर महामेळावा भरविला जात होता. महामेळाव्याला रितसर परवानगीही घेतली जात होती पण गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळी कारणे सांगत परवानगी देण्यात आली नाही. तरीही मराठी भाषिक महामेळावा यशस्वी करीत होते. गतवर्षीपासून महामेळाव्याच्या ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे शिनोळी येथे रास्ता रोको करून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यंदा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समितीच्यावतीने मेळावा घेण्याचा निर्धार करत पाच ठिकाणच्या जागांची पाहणी करण्यात आली होती.
पण त्या पाचही ठिकाणी पोलीस आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी 144 कलमांतर्गत जमावबंदी आदेश लागू करत पोलीस फौजफाटा तैनात केला होता. पण समिती नेते आणि कार्यकर्ते सोमवारी सकाळी 10 पासून धर्मवीर संभाजी चौकात दाखल होऊ लागले. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. त्यामुळे त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, खडेबाजारचे साहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा एच., पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी धरपकड करत समिती नेते व कार्यकर्त्यांना पोलीस वाहनात कोंबण्यास सुरुवात केली.
संभाजी चौकात येणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत त्यांना एपीएमसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी नेते व कार्यकर्त्यांनी ठाण्यासमोरच ठिया आंदोलन करत घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळानंतर समिती नेते व कार्यकर्त्यांना मारिहाळ पोलीस ठाण्याकडे नेण्यात आले. त्याठिकाणीही संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या. पोलीस ठाण्याच्या आवारात ताडपत्री आणि खुर्च्या देऊन सगळ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. पोलिसांकडून देण्यात आलेले पिण्याचे पाणी नेते व कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून पाणी व चिरमुरे आणले. दुपारनंतरही सुटका करण्यात न आल्याने त्याचठिकाणी कार्यकर्त्यांनी जेवण केले. सायंकाळी ताब्यात घेतलेल्या सर्वांना नोटीस बजावून सुटका करण्यात आली. 82 जणांना ताब्यात घेण्यात आले असले तरी 78 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









