बेळगाव / प्रतिनिधी – केंद्र सरकारने आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष या निमित्त ” हर घर तिरंगा ” अभियान राबवण्याचे आवाहन केले आहे. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यात येणार आहे. ही बाब अत्यंत आनंदनीय आहे. मात्र राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याकडे गांभीर्याने लक्ष द्या. विशेष करून प्लास्टिक ध्वज विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे. आशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. अमृत महोत्सवी वर्षात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे जनतेने स्वागत केले आहे. मात्र राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे . हिंदू जनजागृती समिती राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी गेली 12 वर्षे हे निवेदन देत आहे, तरी देखील काही वेळा राष्ट्रध्वजाचा अवमान होताना दिसत आहे. तेव्हा राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी जनजागृती बरोबरच कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी महसूल अधिकारी एस. एम. बर्गे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी सुधीर हिरेकर, मारुती लोहार सविता बोंगाळे, अर्चना लिमये, गोपीनाथ महागावकर, सदानंद मासेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.