वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूर सरकारने एडिटर्स गिल्डच्या सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. एडिटर्स गिल्डचे सदस्य राज्यात हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतेच एडिटर्स गिल्डने मणिपूर सरकारवर पक्षपाती कारवाई केल्याचा आरोप केला होता.
राज्यात हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एडिटर्स गिल्डच्या सदस्यांवर राज्य सरकारने गुन्हा दाखल केला आहे. मणिपूरच्या जातीय हिंसाचारावर एकतर्फी मीडिया रिपोर्टिंग होत असल्याचा दावा एडिटर गिल्डने नुकताच केला होता. यासोबतच मुख्यमंत्री पक्षपाती असल्याचा आरोपही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कडक पवित्रा घेतला आहे. मी एडिटर्स गिल्डच्या सदस्यांना सतर्क केले असून जर त्यांना काही करायचे असेल तर त्यांनी आधी हिंसाचारग्रस्त ठिकाणी भेट द्यावी आणि वास्तविकता पाहावी. सर्व समाजाच्या प्रतिनिधींना भेटून नंतर अहवाल तयार करा. केवळ ठराविक वर्गाच्या लोकांशी बोलून कोणतीही निरीक्षणे नोंदवणे निंदनीय असल्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले. एडिटर गिल्डच्या अध्यक्षा सीमा मुस्तफा यांच्यासह सीमा गुहा, भारत भूषण आणि संजय कपूर या तीन सदस्यांचा एफआयआर दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.









