कोल्हापूर :
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना वेळापत्रकानुसार योग्य पद्धतीने राबवा, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले. मतदान केंद्रांची निश्चिती करताना सर्व सुविधांची पडताळणी करण्याचे आणि आवश्यक दुरुस्त्या तातडीने पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
महाराष्ट्र राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी कोल्हापूर जिह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मतदान केंद्रांवर पाणी, वीज, स्वच्छतागृहे यासारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशिक्षण देण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीबाबत सविस्तर माहिती सादर केली. यामध्ये मतदार संख्या, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम), मतदान केंद्रांची व्यवस्था आणि इतर अनुषंगिक तयारी यांचा समावेश होता. त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाची माहितीही आयुक्तांना दिली. यावेळी त्यांनी प्रभाग रचनेचे वेळापत्रक, मतदान केंद्रांची रचना आणि निवडणूक प्रक्रियेच्या तयारीबाबत सादरीकरण केले.
- ईव्हीएमच्या स्ट्राँग रूमला भेट
आयुक्त वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर करवीर तहसील कार्यालयात राज्य निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमला भेट दिली. यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेची आणि व्यवस्थापनाची पाहणी केली. स्ट्राँग रूममधील व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेची पडताळणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.
- निवडणूक पारदर्शक, निपक्ष करा
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निपक्ष आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकशाहीचा पाया मजबूत करणाऱ्या असून यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.








