सुवर्णसौधमध्ये बैठक, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्या सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
निवडणूक नि:पक्षपणे पार पाडणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व पथकांनी अधिक तीव्रगतीने काम करावे. आचारसंहिता भंग होऊ नये, यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे ग्रामीण मतदारसंघाच्या खर्च निरीक्षकपदी नियुक्त करण्यात आलेल्या सुबोध सिंग यांनी सांगितले.
सुवर्णसौध येथील सभागृहामध्ये शनिवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केली आहे. जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघांमध्ये निवडणूक ही मुक्त वातावरणामध्ये पार पाडली पाहिजे. याचबरोबर नि:पक्षपणे आपण साऱ्यांनी काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.
प्राप्तिकर, रेल्वे उत्पादन शुल्क यासह सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी यासाठी चर्चा करून आवश्यक ती उपाययोजना केली जाईल, असेही ते म्हणाले. निवडणुकीमध्ये मतदारांना आमिषे दाखविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. त्यासाठी आपण सर्वांनी दक्षपणे काम करावे, असे सांगितले. सध्या डिजिटल युग असून डिजिटलवर आर्थिक व्यवहार होत असतील तर त्यावरही लक्ष ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाई
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचीनुसार साऱ्यांनी काम करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होत असतील तर ते रोखण्यासाठी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. विविध फिरती पथके, चेकपोस्ट याबाबतची माहिती त्यांनी दिली. या निवडणूक काळात लक्ष ठेवण्यासाठी 18 व्हिव्हीटी आणि 51 व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम तयार करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता भंग होऊ नये, यासाठी सर्व पथके कार्यरत ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सूचना केल्या आहेत.
आतापर्यंत 11 कोटी 50 लाख जप्त
आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 11 कोटी 50 लाख 91 हजार 970 रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर 53 लाख 67 हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आल्याचे सांगितले. याचबरोबर इतर मुद्देमाल असा एकूण 19 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला गेला आहे, असे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
2 हजार 217 संवेदनशील केंद्रे
जिल्ह्यातील 18 मतदारसंघांमधील 2 हजार 217 संवेदनशील केंद्रे म्हणून नोंद करण्यात आली आहेत. त्याठिकाणी वेबकास्टींगच्या माध्यमातून सर्व माहिती जमा केली जाणार आहे. याचबरोबर 11 सशस्त्र सीमा दलाच्या तुकड्यांनी पथसंचलन केले आहे. मतदारांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकूण 4 हजार 434 मतदान केंद्रे
जिल्ह्यामध्ये सध्या मतदारयाद्यांनुसार 4 हजार 434 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मात्र 10 एप्रिलपर्यंत मतदारयाद्यांमध्ये आणखी किती नावे दाखल झाली आहेत, त्याची आकडेवारी पाहून मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये बदल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चेकपोस्टवर सखोल तपासणी
वाहनांची तपासणी करण्यासाठी 21 आंतरराज्य तपासणी नाके, 22 आंतरजिल्हा तपासणी नाके तसेच काही जिल्ह्यांमध्ये 12 अंतर्गत तपासणी नाकेही स्थापन करण्यात आल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले. या चेकपोस्ट नाक्यांवर दक्षता घेण्यात आली असून वाहनांची तपासणी केली जात आहे. रोकड तसेच अवैध वस्तू आणि वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नोडल अधिकारी हर्षल भोयर, आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिंदे, सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.









