शिवबसवनगर, गँगवाडीतील रहिवाशांचा इशारा

बेळगाव : शहरातील विविध भागातील रस्त्यांचा विकास, गटारींचे बांधकाम तसेच इतर विकासकामे केली आहेत. मात्र शिवबसवनगर, गँगवाडीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, विकासकामे राबविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय येथील रहिवाशांनी घेतला आहे. महापालिका हद्दीत येणाऱ्या गँगवाडी परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. गटारीचे बांधकाम करण्यात आले नाही. शिवबसवनगर परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोट्यावधी निधी खर्ची घालण्यात आला, पण गँगवाडी परिसरातील विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. कित्येक वर्षापासून या परिसरातील समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. समस्यांचे निवारण करण्यासाठी मनपाला अनेकवेळा निवेदने दिली. पण काहीच उपयोग झाला नाही. अद्यापही महापालिका व जिल्हा प्रशासनाने विकासाकडे कानाडोळा केला आहे. निवडणुकीपूर्वी विकासकामे करावीत, अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय येथील मरगाई युवक संघ व मांग गारूडी समाजाने घेतला आहे. याबाबतचे पत्रक संघटनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले.









