महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांचा आदेश : महापालिकेत बैठक घेऊन केयुआयडीएफसी, एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : चोवीस तास पाणीपुरवठा करण्याबाबत काही ठिकाणी पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून आतापर्यंत केवळ 31 टक्केच काम पूर्ण झाले आहे. 60 टक्के काम होणे गरजेचे होते. मात्र अत्यंत संथगतीने काम सुरू असल्यामुळे कामे अर्धवट आहेत. तेव्हा तातडीने ही कामे पूर्ण करा, अशी स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच केयुआयडीएफसीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. महापालिकेमध्ये कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोरेशन आणि एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेऊन ताकीद देण्यात आली. 24 तास पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये पाईपलाईन घालण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. आता तोंडावरच गणेशोत्सव असून खोदाई केलेल्या चरी तातडीने बुजवाव्यात, असेही आयुक्तांनी सांगितले.
हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण करा. सध्या या पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवट आहेत. काही ठिकाणी खोदाई करायची, पाईप घालायचे तर काही ठिकाणी केवळ खोदाई करून बरेच दिवस फिरकायचे नाही, असे प्रकार सुरू आहेत. हे तातडीने थांबवावे, असे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले. शहरातील ज्यांनी पाणीपट्टी भरली नाही त्यांची यादी तयार करा. त्यांना प्राथमिक नोटीस पाठवून समज द्या, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. कोणत्याही ठिकाणी काम सुरू असेल तर त्या ठिकाणी कामांबाबतची माहिती तसेच रस्ता बंद असल्याचे सूचना फलक लावावेत, सदर कामांपासून इतरांना त्रास होणार नाही. तसेच वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडेही लक्ष द्यावे. सदर योजना ही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. शहरातील सर्वच भागाला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी दक्षता घ्या. दूषित पाणीपुरवठा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर संबंधितांकडून दंडही वसूल करावा, असेही स्पष्ट करण्यात आले. एकूणच 24 तास पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी केयुआयडीएफसीचे आणि एलअॅण्डटी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









