प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 404 जवानांचा दीक्षांत समारंभ
@ प्रतिनिधी/ बेळगाव
शिस्त आणि शारीरिक सुदृढता ही सैनिकांच्या जीवनात अत्यंत महत्वाची आहे. हे महत्व ओळखून सैनिकांनी कार्यरत रहावे आणि मराठा लाईट इन्फंट्रीचा वैभवशाली वारसा पुढे न्यावा, असे विचार ब्रिगेडीयर जोदीप मुखर्जी यांनी व्यक्त केले.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 404 जवानांचा दीक्षांत समारंभ शनिवारी शानदारपणे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. परेड ग्राऊंडवर झालेल्या या समारंभाचे परेड ऍडज्युटंट मेजर यु. एस. पिल्लाई होते. तर रिप्रुट प्रतिक चंद्रकांत धिगे हे कमांडंट होते. प्रारंभी ब्रिगेडीयर मुखर्जी यांना प्रशिक्षणार्थी सैनिकांनी मानवंदना दिली. त्यानंतर तिरंगा ध्वजाच्या साक्षीने सैनिकांनी मातृभूमीच्या संरक्षणाची व त्यासाठी आत्मबलीदान देण्याची शपथ घेतली.
यानंतर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या जवानांना पारितोषिक देण्यात आली. सर्वोत्कृष्ट रिप्रुटसाठी असलेले व्हिक्टोरीया क्रॉस मेडल विक्रम संजय लवंदे यांना देण्यात आले. शर्कत युध्द स्मारकाला पुष्पचक्र वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला.









