स्थानिक उत्पादनाला योग्य भाव देण्याची मागणी : चांगल्या दर्जाचे गाजर पिकवूनही कवडीमोल दर
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील झाडशहापूर, मच्छे यासह परिसरात मोठ्या प्रमाणात गाजर पीक घेतले जाते. परंतु, अनेक बडे व्यापारी परराज्यातील गाजर बेळगावच्या घाऊक बाजारात आणत असल्याने स्थानिक गाजरांना कमी भाव मिळत आहे. चांगल्या दर्जाचे गाजर पिकवून देखील कवडीमोल दराने विक्री करावी लागत असल्याने गाजर उत्पादक शेतकऱ्यांचा जय किसान भाजी मार्केटवर शनिवार दि. 15 रोजी भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
गुरुवारी रात्री यासंदर्भात शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आंदोलनाबाबत चर्चा झाली. गाजर या पिकाला देशभर मागणी आहे. दरवर्षी मच्छे, झाडशहापूर, मजगाव, अनगोळ शिवारात मोठ्या प्रमाणात गाजराचे उत्पादन घेतले जात आहे. यापूर्वी गाजराला बेळगाव बाजारात चांगला दर असल्याने शेतकऱ्यांना चार पैसे उरत होते. परंतु, सध्या बेळगावमधील मोठे व्यापारी परराज्यातून निकृष्ट दर्जाचे गाजर बेळगावमध्ये आणत आहेत. त्या गाजरांचा दर कमी असल्याने बेळगावच्या गाजरांना कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे.
परराज्यातील गाजर बंद करा,स्थानिक गाजरांना भाव द्या
मागील काही दिवसात नाशिक, इंदूर तसेच इतर भागातून मोठ्या प्रमाणात भाजी मार्केटमध्ये गाजराची आवक झाली. याचा परिणाम बेळगावच्या गाजरांचे दर गडगडले. परराज्यातील गाजर आयात करणे बंद करा व स्थानिक गाजरांना भाव द्या, अशी मागणी गुरुवारच्या बैठकीत करण्यात आली. शनिवारी सकाळी 9 वाजता जय किसान भाजी मार्केटसमोर भव्य आंदोलन केले जाणार आहे. यावेळी बेळगाव परिसरातील गाजर उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बसवंत चिठ्ठी, कृष्णा गोरल, परशराम नंदिहळ्ळी, परशराम गोरल, दुर्गाप्पा पिरनवाडी, अरुण नंदिहळ्ळी, नारायण गोरल, आकाश नंदिहळ्ळी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.









