प्रतिनिधी / पणजी
‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश देणारा कार्निव्हल महोत्सव आज शुक्रवार 17 फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्याचा शुभारंभ पर्वरी येथून प्रथमच केला जात आहे. एरव्ही पणजीतील मिरवणुकीने कार्निव्हल सुरु व्हायचा. पर्वरी येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ते अँकडील स्कुल या मार्गावर आज यावर्षीच्या कार्निव्हलची पहिली मिरवणूक निघणार आहे. राज्यात विविध ठिकाणी मिळून एकूण 5 दिवस कार्निव्हल महोत्सव होणार आहे.

शनिवार 18 फेब्रुवारी रोजी पणजीत मिरवणूक होणार असून नवीन पाटो पुल ते कांपाल मैदान असा तिचा मार्ग आहे. जुन्या सचिवालयाकडे तिला पर्यटनमंत्री रोहन खंवटे हिरवा बावटा दाखवून शुभांभ करणार आहेत.
रविवार 19 फेब्रुवारी रोजी मडगावात कार्निव्हल मिरवणूक आयोजित करण्यात आली असून ती होली स्पिरीट चर्च ते मडगाव पालिका चौक अशी जाणार आहे.

सोमवार 20 फेब्रुवारीला वास्को येथे मिरवणूक असून ती सेंट अँन्ड्य्रू जंक्शन ते जोशी चौक अशी होणार आहे.
मंगळवार 21 फेब्रुवारी रोजी म्हापसा व मोरजी-पेडणे अशा दोन ठिकाणी एकाचवेळी मिरवणूक निश्चित करण्यात आली आहे. म्हापशातील मिरवणूक म्हापसा कोर्ट ते म्हापसा बसस्थानक अशी निघणार आहे. मोरजीतील मिरवणूक मोरजी खिंड ते मोरजी जंक्शन अशी रंगणार आहे. सर्व ठिकाणी सायंकाळी 3.30 व. मिरवणूक चालू होणार असून उशिरा त्याची सांगता केली जाणार आहे.









