पालिका बैठकीत ठराव : मडगावातील नगरसेवकांकडून स्वागत, फातोर्डातील नगरसेवकांकडून नाराजी
मडगाव : मडगाव पालिकेकडून यंदा कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक 19 फेब्रुवारी रोजी आयोजण्यात आली असून यावेळी ही मिरवणूक तसेच त्यापुढील शिमगोत्सव मिरवणूकही फातोर्डातील रवींद्र भवनमार्गे न काढता पारंपरिक होली स्पिरीट चर्च ते मडगाव पालिका चौक या मार्गावर होईल, अशी माहिती मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली. शुक्रवारी मडगाव पालिका मंडळाची बैठक झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना शिरोडकर यांनी ही माहिती दिली.
या नव्या मार्गाचे या बैठकीत मडगावातील नगरसेवकांनी स्वागत केले असले, तरी मार्ग बदलल्यामुळे फातोर्डातील नगरसेवकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. माजी नगराध्यक्ष असलेले लिंडन पेरेरा यांनी ही मिरवणूक फातेर्डातील रवींद्र भवन मार्गावरून होण्याची गरज व्यक्त केली. मडगावात वाहतूक कोंडी होत असल्याने तसेच पार्किंगची सुविधा नसल्याने ही मिरवणूक सध्याच्या मार्गावरच घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नगरसेवक महेश आमोणकर यांनी पुन्हा होली स्पिरीट चर्च ते मडगाव पालिका चौक अशी कार्निव्हल मिरवणूक घेण्याची मागणी जोरदाररीत्या उचलून धरली. पार्किंगसाठी लॉयोला हायस्कूलचा मैदान परिसर वापरण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू शकतो. जुन्या मार्गावर लोकांचा उन्हापासून बचाव होतो, तर फातोर्डात उन्हात उभे राहावे लागत असल्याने प्रेक्षकांपैकी काहींना घेरी येण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत, असा दावा त्यांनी केला.
या चर्चेदरम्यान नगरसेवक पेरेरा व आमोणकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. भाजप समर्थक सत्ताधारी गटाकडे बहुमत असल्याने शेवटी मडगावात होली स्पिरीट ते पालिका चौक या मार्गावरूनच सदर मिरवणुका आयोजिण्याचा ठराव घेण्यात आला. दरम्यान, राज्यात 8 ते 21 मार्चदरम्यान शिमगोत्सव मिरवणुकांचे आयोजन होणार असून मडगाव शहरात ही मिरवणूक कधी होणार ते अजून निश्चित करण्यात आलेले नाही, अशी माहिती शिरोडकर यांनी दिली.
कार्निव्हल आयोजन समिती अध्यक्षपदी कामिलो बार्रेटो
नगरसेवक कामिलो बार्रेटो यांची कार्निव्हल आयोजन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी सांगितले. उर्वरित समिती लवकरच स्थापित केली जाईल. शिमगोत्सव मिरवणुकीचे आयोजन जुनी समिती करणार आहे. आयोजन समितीवर पदसिद्ध अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षांची नियुक्ती होत असल्याने पालिका मंडळाने कार्यकारी अध्यक्ष निवड व अन्य प्रक्रियेसाठी मला सर्वाधिकार दिले आहेत. शिमगोत्सव मिरवणूक तारीख जाहीर झाल्यानंतर लगेच सर्व प्रक्रिया मार्गी लावण्यात येईल, असे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी स्पष्ट केले.









