पणजी : राजधानी पणजीत आज शनिवारी 18 रोजी कार्निव्हल मिरवणूक काढण्यात येणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. काल शुक्रवारी पर्वरी येथे कार्निव्हलची पहिली मिरवणूक झाली. त्यानंतर आज पणजीत आयोजित केलेल्या मिरवणुकीत अनेक चित्ररथ सहभागी होणार आहेत. मांडवी नदीच्या किनारी असलेल्या बांदोडकर मार्गावरून सदर मिरवणूक जाणार असून अनेक ठिकाणी व्यासपीठ उभारून दर्शकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नवीन पाटो पुलावरून मिरवणूक सुरू होणार असून दुपारी 3.30 वा. जुन्या सचिवालयासमोर तिला हिरवा बावटा दाखविण्यात येणार आहे. प्रथम पर्यटन खात्यातर्फे ‘किंग मोमो’चा चित्ररथ सर्वांत पुढे राहणार असून इतर चित्ररथ व नृत्य गायन करणारी पथके त्यामागून जाणार आहेत. पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात हे कार्निव्हल मिरवणुकीच्या शुभारंभासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. मिरवणुकीला अडथळा होऊ नये, म्हणून बांदोडकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून तो एकंदरीत मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवला जाणार आहे. कला अकादमी ते कांपाल मैदानापर्यंत कार्निव्हल मिरवणूक जाणार असून तेथे समाप्त होणार आहे. बांदोडकर मार्ग विविध फलकांनी व मुखवटे लावून सजविण्यात आला असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मार्गाच्या मधोमध बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. दुपारी 2 वाजल्यानंतर बांदोडकर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे.









