पारंपरिक मार्गावरील मिरवणूक पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, आकर्षक चित्ररथांचा समावेश

मडगाव ; पारंपरिक गीते, ठेका धरायला लावणारे संगीत, गोव्यातील पारंपरिक व्यवसायांचे दर्शन घडविणारे चित्ररथ यांचा समावेश असलेली कार्निव्हल मिरवणूक रविवारी मडगावात जल्लोषात पार पडली. या मिरवणुकीला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सदर मिरवणूक यंदा पुन्हा एकदा फातोर्डाच्या ऐवजी मडगावातील होली स्पिरीट चर्च ते पालिका चौक या पारंपरिक मार्गावरून घेण्यात आली आणि लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा राहून सदर मिरवणुकीची मजा लुटली. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बावटा दाखवून रविवारी सायंकाळी कार्निव्हल मिरवणुकीस प्रारंभ केला. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आमदार उल्हास तुयेकर, आमदार आलेक्स सिकेरा, माजी आमदार दामू नाईक, माजी मंत्री चर्चिल आलेमाव, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आणि मडगाव पालिकेचे अन्य नगरसेवक उपस्थित होते.

कार्निव्हल मिरवणूक पाहण्यासाठी पालिका चौकाच्या ठिकाणी तर लोकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. यात देशी-विदेशी पर्यटकांचाही भरीव प्रमाणात सहभाग राहिला. लोकांनी रस्त्यावर गर्दी करताना जवळच्या इमारतींमध्येही गर्दी करून या मिरवणुकीचा आनंद लुटला. किंग मोमाने ‘खा, प्या व मजा करा’ असा संदेश दिल्यानंतर एकामागून एक आकर्षक चित्ररथ दाखल झाले. विविध गटांमध्ये ही चित्ररथ मिरवणूक झाली. त्यातगोव्याच्या पारंपरिक व्यवसायांचे दर्शन घडविणाऱया चित्ररथांबरोबर सामाजिक जागृती करणारे चित्ररथही राहिले. यात फळ बागायती, गोव्याचा पावसाळय़ातील पुरुमेत यावरील तसेच मिठाचे आगर वाचवा, प्लास्टिकपासून दूर राहा, मद्य प्राशन करून वाहन चालवू नका असे संदेश देणारे चित्ररथही होते. यावेळी वेशभूषा स्पर्धा देखील घेण्यात येऊन त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय गोव्याची पारंपरिक नृत्ये पथकांनी सादर केली.
बेकायदेशीर विक्रेत्यांचा लोकांना त्रास
कार्निव्हल पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली असताना कोमुनिदाद इमारत, सडेकर लेन व पालिकेच्या सभोवतालील परिसरातील पदपथांवर बेकायदा विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने या मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी आलेला लोकांना त्रास झाले. पालिकेच्या मार्केट निरीक्षकांकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच या ठिकाणी तैनात करण्यात आलेले पोलीस व वाहतूक पोलिसांनीही या बेकायदा विक्रेत्यांकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले.









