वृत्तसंस्था/ झाग्रेब (क्रोएशिया)
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने पुन्हा एकदा तो जगातील सर्वोत्तम खेळाडू असल्याचे सिद्ध केले असून एक फेरी शिल्लक असताना सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. दुसरीकडे, जागतिक विजेता डी. गुकेश क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.
नऊ फेऱ्यांच्या रॅपिड स्पर्धेत गुकेशपेक्षा चार गुणांनी मागे पडल्यानंतर कार्लसनने ब्लिट्झ विभागात सर्वाधिक फायदा घेतला आणि पहिल्या टप्प्यात नऊ पैकी 7.5 गुण मिळवले. परतीच्या सामन्यांत पहिल्या आठ गेम्समध्ये चार गुण मिळवून कार्लसनने आणखी एक स्पर्धा आपल्या नावावर जमा केली. रॅपिड विभागात चमकदार सुऊवात करून 14 गुण मिळविणाऱ्या गुकेशला ब्लिट्झ विभागात त्याच्या पहिल्या नऊ गेम्समधून फक्त 1.5 गुण मिळवता आले. जरी त्याने शेवटच्या नऊ ब्लिट्झ सामन्यांमध्ये काही प्रमाणात प्रगती केली असली, तरी कार्लसनला पकडण्यासाठी ते पुरेसे नव्हते.
कार्लसनने स्पर्धेचा शेवट 22.5 गुणांसह केला. तो अमेरिकेच्या वेस्ली सोपेक्षा 2.5 गुणांनी पुढे राहिला. वेस्ली दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर गुकेश 19.5 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आला. 1,75000 अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेतून कार्लसनने 40,000, वेस्लीने 30,000 आणि गुकेशने 25,000 डॉलर्स जिंकले. गुकेश तिसऱ्या क्रमांकावर राहिला असला, तरी त्याने असाधारण कामगिरी करून आपल्या टीकाकारांना चुकीचे सिद्ध केले. गुकेश फ्रान्सचा अलिरेझा फिरोजा आणि पोलंडचा डुडा जान-क्रिज्स्टोफ यांच्यापेक्षा अर्ध्या गुणाने पुढे राहिला.
सहावे स्थान उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हला प्राप्त होऊन तो अमेरिकेचा फॅबियानो काऊआना आणि हॉलंडचा अनीश गिरी यांच्यापेक्षा पुढे राहिला. भारताच्या आर. प्रज्ञानंदने या वर्षी तीन क्लासिकल स्पर्धा जिंकल्यानंतर दुर्मिळ घसरणीचा सामना केला. कारण तो 15 गुणांसह नवव्या स्थानावर राहिला, तर क्रोएशियाचा इव्हान सारिच 13 गुणांसह दहाव्या स्थानावर राहिला.
गुकेशला शेवटच्या फेरीच्या सामन्यातही प्रज्ञानंदवर विजय मिळवता आला नाही. दोन्ही बाजूंनी पारडे झुकत राहिलेला हा सामना शेवटी बरोबरीत सुटला. मात्र जगातील सर्वांत युवा विश्वविजेता असलेला गुकेश खेळाच्या जलद आवृत्तीतील सकारात्मक निकाल म्हणून याकडे पाहू शकतो.









