एरिगेसीचा वेई यीला धक्का
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर (नॉर्वे)
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने येथील नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशच्या संधींना मोठा धक्का दिला आणि खेळाचा शेवटचा टप्पा हाताळण्यातील आपले प्रभुत्व दाखवत तीन पूर्ण गुण मिळवले.
पाच वेळचा विश्वविजेता कार्लसन त्याच्याहून अर्ध्या वयाच्या प्रतिस्पर्ध्याविऊद्ध खेळत असला, तरी या लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेतील सर्वांत महत्वाच्या गणल्या गेलेल्या या सामन्यात आणि चार तासांहून अधिक चाललेल्या क्लासिककल चेसच्या या खेळात गुकेशने बहुतेक वेळा नॉर्वेच्या गतविजेत्यावर दबाव आणला. परंतु त्यानंतर भारतीय खेळाडूने एक मोठी चूक केली आणि 55 चालींमध्ये त्याला पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर कार्लसनने तीन गुण मिळवले आणि तो अमेरिकन ग्रँडमास्टर आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारू नाकामुरासह संयुक्तपणे आघाडीवर आहे. नाकामुराने अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो काऊआनाला हरवले. या स्पर्धेत सहभागी झालेला दुसरा भारतीय खेळाडू अर्जुन एरिगेसीने क्लासिकल चेसची लढत अनिर्णित राहिल्यानंतर एका रोमांचक आर्मागेडन गेममध्ये चीनचा अव्वल खेळाडू वेई यीचा पराभव केला. या विजयातून एरिगेसीने 1.5 गुण मिळवले, तर वेईला एक गुण मिळाला.
स्पर्धेच्या गुण नोंदविण्याच्या व्यवस्थेनुसार क्लासिकल चेस लढतीत विजेत्याला तीन गुण मिळतात. जर क्लासिकल गेम अनिर्णित राहिला, तर खेळाडूंना प्रत्येकी एक गुण मिळतो आणि नंतर आर्मागेडनमध्ये विजय मिळविल्यास आणखी अर्धा गुण प्राप्त होतो. दुसरीकडे, महिला गटात दोन वेळची वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन कोनेरू हम्पीने आर. वैशालीविऊद्ध निर्णायक विजय मिळवला. शांतपणे आणि अचूक खेळ करताना हम्पीने खेळाच्या शेवटच्या टप्प्यात तिच्या प्रतिस्पर्ध्याच्या चुकांचा फायदा घेतला. कार्लसन-गुकेश सामना रंगतदार झाला. नॉर्वेच्या खेळाडूने पांढऱ्या सेंगाट्यांसह खेळताना त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर शेवटच्या टप्प्यात दबाव आणून चूक करण्यास भाग पाडले आणि लढत अचूकपणे आपल्या बाजूने झुकविली. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा, 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर संपूर्ण वर्षभरात वैयक्तिक क्लासिकल चेस स्पर्धेत न खेळलेल्या कार्लसनची सुऊवात आशादायक नव्हती. नॉर्वेजियन खेळाडूने कबूल केले की, जोबावा लंडनमध्ये खेळण्याचा त्याचा निर्णय नियोजनानुसार झाला नाही. त्याने सलामीच्या खेळातून गुकेशला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही चालींनंतरच त्याला कळले की, त्याला त्यातून फार मजल मारता येणार नाही.
खरे तर काळ्या सेंगाट्यांसह खेळणाऱ्या गुकेशने 11 व्या चालीपर्यंत त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडे असलेली पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळण्याची अनुकूलता संपुष्टात आणली होती. पाच वेळा जगज्जेता राहिलेल्या कार्लसनने रॅपिड आणि ब्लिट्झसारख्या छोट्या स्वरुपांकडे तसेच अलीकडे फ्रीस्टाइल बुद्धिबळकडे मोर्चा वळविलेला असला, तरी क्लासिकल चेसकडील आपला संपर्क तुटलेला नाही हे त्याने दाखवून दिले.
भारताचा किशोरवयीन विश्वविजेता डी. गुकेश आणि जागतिक अव्वल क्रमांकावरील खेळाडू मॅग्नस कार्लसन यांच्यातील सामन्यावर लक्ष केंद्रीत झालेले असले, तरी जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या एरिगेसीने आर्मागेडनमध्ये चीनच्या वेईला हरवून सुऊवातीचे गुण मिळवले. दोघांनी क्लासिकल चेस लढतीत 54 चालींनंतर बरोबरी साधली होती. काळ्या सोंगाट्यांनिशी खेळणाऱ्या एरिगेसीने आक्रमक खेळ करून सामना बरोबरीत आणला आणि नंतर आर्मागेडनमध्ये वेळेत त्याच्या प्रतिस्पर्ध्याला हरवले. दुसऱ्या फेरीत एरिगेसीचा सामना गुकेशशी होईल.









