वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे नुकत्याच झालेल्या इंडियन्स वेल्स मास्टर्स बीएनपी पेरीबस पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा कार्लोस अल्कारेझने तसेच पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने अजिंक्यपदे मिळविली.
या स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या अल्कारेझने रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवचा 7-6 (7-5), 6-1 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. गेल्या वर्षीच्या विम्बल्डन स्पर्धेतील अजिंक्यपदानंतर अल्कारेझचे एटीपी टूरवरील हे पहिले विजेतेपद आहे. या अंतिम सामन्यात अल्कारेझने 25 विनर्स फटके तसेच 26 अनियंत्रित चुका केल्या. तर मेदव्हेदेवने 11 विनर्स फटके आणि 23 अनियंत्रित चुका नोंदविल्या. फेब्रुवारीच्या अखेरीस झालेल्या रिओ खुल्या टेनिस स्पर्धेत खेळताना अल्कारेझचा घोटा दुखावला होता. या जेतेपदाबरोबरच अल्कारेझने 1.1 दक्षलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली. इंडियन्स वेल्स स्पर्धेत यापूर्वी सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोव्हिचने 2014 ते 2016 या कालावधित सलग 3 वेळेला अजिंक्यपदे मिळविली होती.
महिलांच्या विभागात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने इटलीच्या मारिया सॅकेरीचा 6-4, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये तासभराच्या लढतीत फडशा पाडत जेतेपदाला गवसणी घातली. 12 दिवस चाललेल्या या स्पर्धेत टॉप सिडेड स्वायटेकने 6 सामन्यात केवळ 21 गेम्स स्वत:वर करवून घेतले. 2021 पासून सॅकेरी स्वायटेकला पराभूत करु शकलेली नाही. स्वायटेकने या जेतेपदाबरोबरच 1.1 दक्षलक्ष डॉलर्सचे बक्षिसही मिळविले.









