सोलापूरकरांसाठी दिवाळी भेट! मुंबई विमानसेवा सुरू
सोलापूर : विमानसेवेची सोलापूर-मुंबई नागरिकांची मागणी पूर्ण होत आहे, ही सोलापूरकरांना दिवाळीची दिलेली भेट आहे. यानंतर आगामी काळात सोलापुरात कार्गो सेवा, नाईट लैंडिंगची सुविधा देणार, असे आश्वासन केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
पुढे म्हणाले की, सोलापूर हे राज्यातील दक्षिण-पश्चिमेकडील महत्वाचा जिल्हा आहे. देवभूमी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. वस्त्रोद्योगासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. सोलापूर देशाच्या आर्थिक राजधानीला जोडले जात असल्याने उद्योग-शेती विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ‘उडान’ योजनेअंतर्गत ६५ कोटी रुपये खर्च करून विमानतळ टर्मिनल इमारत उभारण्यात आली आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेसाठी आर्थिक तूट भरून काढण्यासाठी राज्य शासनाने हमी घेतल्याने ही विमानसेवा सुरू होत आहे.
येत्या काळात हैद्राबाद आणि तिरुपतीसारख्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वाधिक विमानतळ कार्यान्वित असून राज्यातील विमानसेवेचा विस्तार करण्यासाठी आवश्यक सुविधांचा विकास करण्यात येत आहे. देशातील पहिले समुद्रातील विमानतळ पालघर येथे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भरीव मदत
कार्यक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अनेकांकडून मुख्यमंत्र्यांना मदतीचा धनादेश देण्यात आला. यामध्ये बालाजी आमाईन्सच्यावतीने एक कोटीचा धनादेश डी. रामरेड्डी व ए. राजेश्वररेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला. याशिवाय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सभापती दिलीप माने, उपसभापती सुनील कळके, संचालक राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, श्रीशैल नरोळे यांनी २५ लाखांचा धनादेश, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यातर्फे कार्यकारी अध्यक्ष अमोल भोसले, अमोल शिंदे यांनी २१ लाख, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती च्यावतीने सातलिंग परमशेट्टी यांनी ११ लाख रुपयांचा धनादेश दिला. याच कार्यक्रमात सोलापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या विमानातील पहिले प्रवासी बसव गायकवाड दांपत्याला मुख्यमंत्री यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला.








