..झाडाची फांदी कोसळून विद्यालयाच्या स्वच्छतागृहाची नुकसानी
प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा-पणजी महामार्गावर मानसवाडा पुंडई येथील उतरणीवर एक मालवाहू कंटेनर रस्त्याच्या कडेला कलंडला. या धडकेत झाडाच्या फांद्या तुटून शेजारच्या विद्यालयाच्या स्वृच्छतागृहावर पडल्याने मोठी नुकसानी झाली. सदर घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. सुदैवाने कंटेनरचे चालक व क्लिनर सुखरूप बचावले.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानसवाडा कुंडई उतरणीवर मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने धडक सरळ संरक्षक भिंतीला बसल्यानंतर झाडांच्या फांद्याच्या संपर्कात येऊन तो रस्त्यावर कलंडला. तुटलेल्या झाडाच्या फांद्या खाली असलेल्या हायस्कूल परिसरातील स्वच्छतागृहावर पडल्याने मोठी नुकसानी झाली. सुदैवाने घटना हायस्कूलची वर्दळ सुरू होण्यापुर्वी पहाटे घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा हायस्कूलच्या वेळेत विद्यार्थी व शिक्षकांचे ये-जा या परिसरात असते. त्यामुळे येथील मुख्याध्यापिका, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष व ग्रामस्थांनी सरकारकडे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठी संरक्षक भिंत उभारावी अशी अशी मागणी केली आहे. मानसवाडा उतरणीवर अपघाताच्या अनेक घटना घडलेल्या असून पंचायतीनेही याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









