डिजिटल अरेस्ट, ट्रेडिंग, क्रिप्टो करन्सीद्वारे सायबर गुन्हेगारांचे कारनामे सुरूच : भरभक्कम परताव्याच्या आमिषाने लुबाडणूक
बेळगाव : ककमरी, ता. अथणी येथील एका तरुणाच्या व्हाट्सअॅपवर एक मेसेज येतो. ‘शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करा, दामदुप्पट नफा मिळवा’ असा तो मेसेज असतो. या मेसेजवर विश्वास ठेवून या तरुणाने तब्बल 9 लाख रुपये गुंतविले. परतावा एक रुपयाही मिळाला नाही. मंडोळी रोड, टिळकवाडी येथील एका निवृत्त कर्मचाऱ्याचीही अशाच पद्धतीने व्हाट्सअॅपवर मेसेज करून ‘ट्रेडिंगमध्ये गुंतवा, भरपूर कमवा’, असे सांगत त्याला 32 लाख रुपयांना ठकविण्यात आले आहे.ही केवळ उदाहरणे आहेत. बेळगाव शहर व जिल्ह्यातील अनेकांची ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक केली जात आहे. सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. वारंवार जागृती करूनही झटपट श्रीमंतीच्या नादातून फसवणाऱ्यांची संख्या मात्र वाढतच चालली आहे. ही सायबर क्राईम विभागाचीही डोकेदुखी ठरली आहे.
आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे, असे सांगत आधारकार्ड, बँक पासबुक व भामट्यांकडून आलेल्या मेसेजसंदर्भातील स्क्रीनशॉट घेऊन आपली फसवणूक झाली आहे, पैसे परत मिळवून द्या, असे सांगत सायबर क्राईम विभागाकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. बेळगाव शहर, चिकोडी, गोकाक, अथणी, रामदुर्ग, रायबाग आदी तालुक्यांतून फशी पडलेले सावज बेळगावला येतच आहेत. डिजिटल अरेस्टपाठोपाठ ट्रेडिंगच्या नावाने मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. ककमरी, ता. अथणी येथील शंकर पुजारी यांच्या व्हाट्सअॅपवर 23 मे रोजी एक मेसेज आला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी बनविलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणारे आज कसे श्रीमंत झाले आहेत? याची माहिती देण्यात आली. व्हाट्सअॅप ग्रुपमधील इतरांनाही झटपट श्रीमंतीची हाव सुटली. यापैकी अनेकांनी गुन्हेगारांच्या खात्यावर गुंतवणूक सुरू केली. 23 मे ते 7 जुलै या काळात शंकर यांनी 8 लाख 93 हजार रुपये गुंतवणूक केली आहे. ज्यावेळी परतावा देण्याची वेळ आली, यापेक्षा दुप्पट गुंतवणूक केलात तरच तुम्ही गुंतवलेली रक्कम तुम्हाला परत देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळेच आपण फसलो गेलो, हे या तरुणाच्या लक्षात आले. मंडोळी रोड, टिळकवाडी येथील एका निवृत्त कर्मचाऱ्याची कथाही जवळजवळ अशीच आहे.
या कर्मचाऱ्याशी तर सायबर गुन्हेगारांनी संभाषणही केले. ट्रेडिंगमधील गुंतवणूक किती फायद्याची आहे, गुंतवणूक करणाऱ्यांपैकी अनेकांचे आर्थिक स्तर कसे उंचावले आहेत, याचे गोडवे गाण्यात आले. त्यामुळेच त्यांच्यावर विश्वास बसून या निवृत्त कर्मचाऱ्याने तब्बल 32 लाख रुपये गुंतवणूक केली. परतावा देण्याची वेळ येताच भामट्यांनी ती कंपनीच बंद केली. लगेच दुसऱ्या नावाने कंपनी सुरू करण्यात आली. खडकलाट, ता. चिकोडी, निपाणी येथील तिघा जणांना सायबर गुन्हेगारांनी क्रिप्टो करन्सीच्या नावाने मोठ्या प्रमाणात ठकविले आहे. ‘क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करा, भरपूर परतावा मिळवा’ असा एक मेसेज व्हाट्सअॅपवर पाठविण्यात आला. त्यानंतर एक लिंक पाठविण्यात आली. स्टारलिंक या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर गुंतवणुकीचा फंडा सुरू झाला. एकदा 4 लाख 11 हजार, 7 लाख, 6 लाख 10 हजार, 5 हजार 700 असे 17 लाख 21 हजार रुपये गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यांना परतावा मिळालाच नाही.
जिल्हा पोलीस व शहर पोलिसांकडून सायबर गुन्हेगारी थोपविण्यासाठी व्यापक जागृतीची मोहीम राबविण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांकडून दाखवल्या जाणाऱ्या आमिषांवर विश्वास ठेवू नका. आमिषाला बळी पडलात तर तुमची फसवणूक होणार, असे वारंवार सांगूनही फशी पडणाऱ्यांची संख्या काही कमी होईना. या सर्व घटना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच घडत आहेत. सावजाकडून ज्या अकौंटवर रक्कम भरून घेतली जाते, त्या अकौंटधारकांपर्यंत पोलीस पोहोचतात. त्यापुढे तपास सरकतच नाही. कारण, तपास यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचू नये, याची गुन्हेगार पुरेपूर काळजी घेत असतात.
कर्नाटकातील सद्यस्थिती लक्षात घेता सायबर गुन्हेगारीच्या 16 हजारहून अधिक प्रकरणांचा तपास रखडला आहे. त्यामुळेच संपूर्ण देशात प्रथमच बेंगळूर येथे कमांड सेंटर सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी प्रणव मोहंती यांची या कमांड सेंटरवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता सायबर गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासाला गती येणार आहे. सायबर क्राईम विंग, सायबर सेक्युरिटी विंग, आयडीटीयू विंग, जागृती व प्रशिक्षणासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. डिजिटल अरेस्ट, ट्रेडिंगमधील गुंतवणूक, क्रिप्टो करन्सीच्या नावे फसवणूक आदींविषयी सावध राहिले नाही तर फसवणूक ही ठरलेलीच आहे.









