उंदीर-घुशींचे कुरतडणे, वाहिनी जुनाट होणे धोकादायक, हाताळताना खबरदारी घेणे आवश्यक
बेळगाव : विजेचा धक्का लागल्याने आठवडाभरात बेळगावमध्ये पाच जणांचा मृत्यू ओढवला आहे. एका घटनेत हेस्कॉम जबाबदार आहे तर दुसऱ्या घटनेत बांधकाम कंत्राटदार जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. हे जरी खरे असले तरी विजेची उपकरणे वापरताना अथवा हाताळताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. कारण विजेचा धक्का लागला की सावरण्याची संधी मिळत नाही. रविवार दि. 6 रोजी बिजगर्णी येथे शिवारात औषध फवारणी करताना विद्युतभारित तार तुटून अंगावर पडल्याने शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला होता. यामध्ये अमित ऊर्फ अहमद मकदूमसाब देसाई व लता देसाई यांचा मृत्यू झाला. हेस्कॉमच्या गलथान कारभाराचे हे दोघे बळी ठरले. शिवारातील विद्युत वाहिन्या व ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्तीच होत नसल्याने हा प्रकार घडला असल्याचा आरोप कुटुंबीय व ग्रामस्थांनी केला.
शनिवार दि. 12 रोजी शाहूनगर येथे नव्या घराच्या बांधकामावर लोखंडी पाईपला स्पर्श झाल्याने तिघांचा मृत्यू झाला. एक चिमुकली व तिच्या आजी-आजोबांचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे अतिशय निकृष्ट दर्जाची विद्युतवाहिनी जोडण्यात आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये हिराप्पा गणकाप्पा राठोड, शांतव्वा राठोड व त्यांची नात अन्नपूर्णा राठोड या तिघांचाही मृत्यू झाला. दोषींवर गुन्हे दाखल केले असले तरी गेलेल्या जिवांची भरपाई होणारी नाही. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. ट्रान्स्फॉर्मरपासून घरगुती मीटरपर्यंत वीजपुरवठा आणून देणे हे जरी हेस्कॉमचे काम असले तरी घरातील वायरिंग व्यवस्थित आहे की नाही, हे तपासणे ग्राहकांचे काम आहे. बऱ्याचवेळा उंदीर, घुशी या विद्युत वाहिन्या कुरतडतात. यामुळे आतील तार बाहेर पडते. या तारेचा संपर्क विद्युतवाहक वस्तूंशी आल्यास त्याही विद्युतभारीत झालेल्या असतात. यामुळे अपघाताची शक्यता असते. खासकरून पावसाळ्यातील ओलाव्यामुळे विजेचे वहन सहजसुलभ होते. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. बऱ्याच ठिकाणी हेस्कॉमच्या विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. तर विद्युत खांब कधी कोसळतील, याची शाश्वती नाही. अशावेळी हेस्कॉमच्या 1912 या हेल्पलाईनवर फोन करून तक्रार नोंदविता येते. तसेच परिसरातील लाईनमन, सेक्शन ऑफिसर यांनाही याची माहिती देता येते. त्यांच्याकडून दखल घेतली न गेल्यास साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी तक्रार निवारण बैठकीचे आयोजन केले जाते. मात्र, त्यावेळी अत्यल्प प्रतिसाद मिळतो. यामुळे प्रत्येक अपघाताला ग्राहकही तितकेच जबाबदार असतात, हे देखील खरे आहे.
काही वर्षांनी विद्युत वाहिनी बदलणे गरजेचे
शनिवारी घडलेली घटना ही कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे घडली आहे. विद्युतवाहिन्या चांगल्या दर्जाच्याच वापरणे गरजेचे आहे. तसेच काही वर्षांनी विद्युत वाहिनी बदलणे गरजेचे आहे. परंतु, बऱ्याच वेळा जुन्याच विद्युत वाहिन्या वापरल्या जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.
– विनोद करुर (साहाय्यक कार्यकारी अभियंता हेस्कॉम)









