आयटीआयच्या विद्यार्थ्यासाठी पहिल्यांदा खास शिबिराचे आयोजन
फोंडा : गोव्यातील विद्यार्थ्याना मिलीटरी सेवेत प्रोत्साहन देण्यासाठी वावरत असलेल्या सार्थक फाऊंडेशन गोवा या स्वयंसेवी संस्थेतर्फे सलग पाच करिअर मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजनानंतर सोमवार 16 ऑक्टो रोजी सकाळी 9.30 वा. राजीव गांधी कला मंदिर येथे खास (औद्योगिक प्रशिक्षण केंद्र) आयटीआयच्या विद्यार्थ्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सार्थक फाऊंडेशनतर्फे पत्रकार परिषदेतून देण्यात आली. सार्थक फाऊंडेशन गोवा व कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनायलय यांच्या संयुक्त विद्यामाने तसेच सैन्यदलाच्या 3 एमटीआर (2 एसटीसी) यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सार्थक फाऊंडेशनचे पदाधिकारी सुदेश नार्वेकर, विनोद चिमुलकर व फातिमा मुल्ला उपस्थित होते. शिबिर खास आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी असून राज्यातील मडगांव, कुंकळीसह विविध आयटीआयमधून सुमारे 1400 विद्यार्थ्यांची नावनोंदणी केलेली आहे. भारतीय सैन्य दलात भरती होणे म्हणजे थेट युद्धात भाग घेणे नसून त्याशिवाय सैनदलात तांत्रिक पद व मल्टी टास्किंगच्या रिकाम्या जागाचीही युवकांनी संधी असते. विद्यार्थ्यामध्ये विद्यार्थीदशेतच सैन्यदलाबाबत रूची निर्माण व्हावी याहेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अग्निवीर संबंधित मेजर दिवाकर खानल, मिलीटरी स्कूलमध्ये कशाप्रकारे प्रवेश घेणे याविषयी मेजर हरजित सिंग, मिलीटरी मेडीकल संधीविषयी मेजर सुभेदार सचिनकुमार हे विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणार आहेत.
सार्थक फाऊंडेशनतर्फे सैन्यदलात भर्तीविषयी नियमित शिबिरे
राजीव कला मंदिर येथे 16 ऑक्टो रोजी होणाऱ्या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे सखाराम गावकर, 6 टिटिआर सैन्य प्रशिक्षण केंद्राचे कर्नल चरणजित सिंग, सार्थकचे अफझल मुल्ला, सुदेश नार्वेकर, विनोद चिमुलकर उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शंका व अडचणी जाणून घेण्यासाठी सैन्यदलाच्या 6 टीटीआर पॅम्पचे कर्नल जसविंदर सिंग यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभणार आहे. सार्थक फाऊंडेशनने आजपर्यंत 120 रक्तदान शिबिरे आयोजन केलेली असून आरोग्य, योगा शिबिरासह सैन्य दलात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 26 नोव्हे. राजी वाळपई येथे करण्यात येणार असल्याची माहिती सुदेश नार्वेकर यांनी दिली.
अग्निवीरासाठी पालकांमध्येही जागृती होणे गरजेचे
मागील वर्षी फेंड्यातील 6 टीटीआर पॅम्पातर्फे सैन्यदलातील भरती कार्यक्रमात 9000 युवकांमध्ये गोव्यातील केवळ 3 युवक सहभागी झाले होते. गोव्यातील युवकांना सैन्य भरतीत प्रोत्साहन देण्यासाठी जागृती अंत्यत गरजेची आहे. पालकांमध्येही जागृतीची आवश्यकता असून केंद्र सरकारतर्फे जारी केलेली अग्निपथ योजनेमार्फत अग्निवीर बनून देशसेवा करण्याची सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.









