जीवन कसे जगावे हे सर्वांना शिकविले जाऊ शकते, परंतु चांगला मृत्यू यावा याबद्दल कुठलाच माणूस किंवा संस्था प्रयत्न करत नाही. इंग्लंडमधील बेलिंडा मार्क्स मागील 40 वर्षांपासून लोकांना चांगल्याप्रकारे मरण यावे याकरता मदत करत आहे. बेलिंडा मार्क्स मृत्यूच्या समीप पोहोचलेल्या लोकांची देखभाल करते. मला मृत्यूची कुठलीच भीती नाही, मृत्यू देखील प्रतिष्ठेने अन् शांतपणे होऊ शकतो, हे मी पाहिले आहे असे ती सांगते.

चांगला मृत्यू देखील जीवनाप्रमाणे आवश्यक असून चांगल्या मृत्यूची तयारी करता येते असे त्या सांगतात. 62 वर्षीय बेलिंडा वेस्ट यॉर्कशायरच्या स्यू रायडर मॅनरलँड्स हॉस्पिसमध्ये अॅडव्हान्स क्लिनिकल प्रॅक्टिशनर आहेत. त्या मागील 4 दशकांमध्ये शेकडो लोकांच्या अंतिम क्षणांच्या साक्षीदार ठरल्या आहेत. त्यांनी या लोकांच्या मृत्यूला सोपे, समाधान अन् सन्मानाची जोड दिली आहे.
काय असते हॉस्पिस?
हॉस्पिसचा अर्थ असे ठिकाण जेथे अत्यंत आजारी लोकांना ठेवण्यात येते. येथे गंभीर आजारी किंवा जे बरे होण्याची शक्यता खूपच कमी असते, अशा लोकांना येथे ठेवण्यात येते. या लोकांना आरामदायी देखभाल आणि भावनात्मक समर्थनाची गरज असते. लोक आम्हाला स्वत:च्या सर्वात अवघड क्षणांमध्ये बोलावतात. आम्ही जर त्यांना काही प्रमाणात मदत करू शकलो, त्यांच्या चेहऱ्यावर अखेरच्या क्षणी हास्य आणू शकलो, तर ते आमच्यासाठी सन्मानाची बाब असते असे बेलिंडा सांगतात.
मृत्यूपूर्वी काय असते इच्छा?
आमच्या हॉस्पिसमध्ये अनेकदा श्वान-मांजर, अश्व देखील रुग्णांना भेटविण्यासाठी आणले जातात. अश्व आत येऊ शकत नाही. परंतु ते बाहेर उभे राहून स्वत:च्या मालकाला अखेरचा निरोप देण्याची प्रतीक्षा करतात. आम्ही अनेक लोकांचा विवाहही करविला आहे. आमच्याकडे एकदा ब्रेस्ट कॅन्सरने पीडित महिला आली होती, मरतानाही स्वत:च्या चेहऱ्यावर मेकअप असावा, अशी तिची इच्छा होती, जी आम्ही पूर्ण केली. त्यानंतर तिच्या पतीने आमचे आभार मानले होते. काही लोक घरातच मरू इच्छितात, काही रुग्णालयात, असे बेलिंडा यांनी म्हटले आहे.
चांगल्या मृत्यूसाठी तयारी
जगात अनेक लोकांनी स्वत:च स्वत:च्या अंत्यसंस्काराचे नियोजन करून ठेवले आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारात कुठले गाणे वाजणार, कोण येणार, काय परिधान करणार हे सर्व त्यांनी ठरविले आहे. या सर्व गोष्टी पूर्वीच ठरविणे स्वत:च्या परिवारासाठी एक गिफ्ट आहे. मी आणि माझ्या पतीने मृत्यूपत्र आणि अंत्यंस्कारावरून सर्वकाही आधीच ठरविले आहे. मी दीर्घ अन् तंदुरुस्त जीवन जगू इच्छिते. परंतु मी मृत्यूची भीती सोडून दिली आहे. मृत्यूही शांतपणे होऊ शकतो, हे मी पाहिले असल्याचे बेलिंडा यांनी म्हटले आहे.
मृत्यूबद्दल समाजात गैरसमज
हॉस्पिस म्हणजे मृत्यूपूर्वीचे अखेरचे दिवस असा लोकांचा समज असतो. परंतु हे सत्य नाही. आम्ही महिने किंवा वर्षभर रुग्णासोबत राहतो, त्यांना जगण्याचे कारण सांगतो, हे हार मानणे नव्हे तर प्रत्येक दिवस चांगला करणे असल्याचे त्यांनी सांगितले. बेलिंडा यांना त्यांच्या कामासाठी ब्रिटिश एम्पायर मेडल आणि क्वीन्स नर्स पुरस्कार मिळाला.









