अन्यथा उपोषणाला बसू ; अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख रियाज खान यांचा इशारा
प्रतिनिधी
बांदा
सावंतवाडी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे कार्डियाक रुग्णवाहिका नसल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होते. रुग्णांना बऱ्याच वेळा जीव सुद्धा गमवावा लागतो. उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका खूप जुन्या व तांत्रिक बिघाडामुळे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा रुग्णांना याचा फटका बसत आहे.
याची दखल घेऊन येत्या आठ दिवसात ही रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अन्यथा सावंतवाडीतील नागरिकांसहित उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे उपोषणाला बसणार असल्याचे पत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अल्पसंख्यांक उपजिल्हाप्रमुख रियाज खान यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहे.येथील बऱ्याच अत्यवस्थ रुग्णांना गोवा बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. मात्र कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने याचा नाहक त्रास रुग्ण तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना होत आहे. आरोग्याचा हा गंभीर प्रश्न असल्याने तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली आहे.









