मध्यप्रदेशमधील दुर्घटना ः बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील छतरपूर येथे बुधवारी दुपारी अडीच वाजता चार वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. ओरछा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपुरा आणि पाथापूर गावाजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बोअरवेलच्या बोगद्याची कॅमेऱयाद्वारे तपासणी केली असता मुलाची हालचाल दिसून आल्यानंतर मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. बचावकार्यावेळी पाऊस सुरू झाल्यामुळे घटनास्थळी दलदल निर्माण झाली होती. तरीही सायंकाळपर्यंत बोअरवेलच्या आजूबाजूला 18 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. प्रशासकीय कर्मचाऱयांचे एक विशेष पथक बचावकार्यात गुंतले आहे.
नारायणपुरा, छतरपूर येथे राहणारा अखिलेश यादव यांचा 4 वर्षांचा मुलगा दिपेंद्र यादव बोअरवेलमध्ये पडला आहे. तो कुटुंबासह शेतात गेला असताना खेळता खेळता तो बोअरवेलमध्ये पडला. दिपेंद्र 40 फूट खोलवर अडकला असून बोअरवेलमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. सदर बोअरवेल वर्षभरापूर्वीच खोदण्यात आली होती. पाणी न मिळाल्याने तेथे झुडपे टाकून बोअरवेल बंद करण्यात आली होती. तथापि, दोन दिवसांपूर्वीच शेततळे करण्यासाठी तेथील झुडपे काढण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
150 लोक बचावकार्यात सहभागी
बचाव पथकाचे सुमारे 150 जण मुलाला वाचवण्यासाठी कामाला लागले आहेत. यामध्ये एसडीआरएफ, पोलीस, नगरपालिका कर्मचाऱयांचा समावेश आहे. याशिवाय 300 हून अधिक ग्रामस्थही मदतीसाठी हजर आहेत. बोअरवेलमध्ये कॅमेरा बसवण्यात आला असून बोअरवेलपासून सुमारे 7 फूट अंतरावरून तीन जेसीबींच्या मदतीने खोदकाम सुरू आहे.