रत्नागिरी :
सांगली येथून पावसाळी पर्यटनानिमित्ताने रत्नागिरीत दाखल झालेल्या पर्यटकांची कार येथील आरे – वारे पॉईंटवरून थेट समुद्रात सुमारे शंभर ते दीडशे फुट खाली कोसळली. गाडी पार्क करून पर्यटक फोटो काढण्यासाठी बाहेर असताना कार अचानक समुद्राच्या बाजूने झुकली अन् क्षणार्धात खोल दरीत कोसळली. सुदैवाने पर्यटकांवर ओढवणारा मोठा अनर्थ टळला. रत्नागिरीतील सर्वात प्रसिद्ध असलेल्या आरे – वारे पॉईंट येथे बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. सांगली येथील दोन पर्यटक पावसाळी पर्यटनानिमित्ताने रत्नागिरीत दाखल झाले होते. आरे वारे येथील – पॉईंटनजीक आल्यानंतर या पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. गाडी समुद्राच्या दिशेने पार्क केल्यानंतर खाली उतरून दोघा पर्यटकांनी फोटो काढण्यास सुरुवात केली. मात्र याचवेळी गाडी अचानक समुद्राच्या बाजूने झुकली अन् क्षणार्धात आरे-वारे पॉईंटवरून कार थेट शंभर ते दीडशे फूट खोल खाली कोसळली. या दुर्घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी येथील पोलीस पाटील आदेश कदम यांना दिली. कोसळलेली कार बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत मागवण्यात आली. संबंधित कार चालकाने आपण हँडब्रेक लावले होते. तरीही कार खाली कोसळली, असे सांगितले. स्थानिकांच्या सहकार्याने सायंकाळी उशिरा क्रेनच्या मदतीने कोसळलेली कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.








