47 जण जखमी : फूटबॉल प्रीमियर लीग विजय परेड सोहळ्याला गालबोट
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनच्या लिव्हरपूर शहरात फूटबॉल प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळाल्यावर जल्लोष करणाऱ्या जमावाला कारने चिरडले असून या घटनेत 47 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 मुलांचा समावेश आहे. 27 जखमींना चार रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून यातील दोन जणांना गंभीर ईजा झाली आहे. तर 20 जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले. हा दहशतवादी हल्ला नव्हता, या प्रकरणाच्या तपासात आम्ही अन्य कुणाचा शोध घेत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
लिव्हरपूलच्या एका 53 वर्षीय श्वेतवर्णीय इसमाला घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. ही एक वेगळी घटना असून आम्ही याप्रकरणी अन्य कुणाचा शोध घेत नसून या घटनेला दहशतवाद मानले जात नसल्याचे मर्सीसाइड पोलीस विभागाच्या अधिकारी जेनी सिम्स यांनी सांतिले आहे.
कशी घडली घटना?
लिव्हरपूल शहराच्या मध्यवर्ती वॉटर स्ट्रीटवर लिव्हरपूल फुटबॉल क्लबच्या प्रीमियर लीगच्या विजयानंतर लोक जल्लोष करत होते. त्याचदरम्यान एक कार गर्दीत शिरली आणि रस्त्यावर जल्लोष करत असलेल्या लोकांना त्या कारने चिरडले आहे. सुमारे 20 मीटरपर्यंत लोकांना चिरडत कार पुढे जात राहिली, ज्यानंतर जमावाने कारवर हल्ला करत तोडफोड केली. पोलीस आरोपी चालकाला व्हॅनमध्ये बसून नेत असतानाही जमावाने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत जखमी झालेल्या लोकांसोबत माझ्या संवेदना असल्याचे म्हटले आहे. लिव्हरपूलमधील आपत्कालीन सेवांच्या उल्लेखनीय साहसाचे त्यांनी कौतुक केले आहे. या भयानकतेशिवाय स्वत:च्या नायकांचा जल्लोष करण्याचे स्वातंत्र्य लोकांना असावे असे उद्गार त्यांनी काढले आहेत.









