प्रतिनिधी /काणकोण
चार रस्ता ते माशे हा मनोहर पर्रीकर बगलमार्ग सध्या अपघात केंद्र बनलेला असून हा केवळ सदोष रस्त्याचा परिणाम असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया या भागातील वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. या मार्गावरील माताश्री हॉटेलच्या नजीक एक जीप उलटण्याची घटना घडल्यानंतर मडगावहून कारवारला निघालेली स्वीफ्ट कार माशे येथे पलटी होण्याची घटना 31 रोजी घडली. वाहनाची किरकोळ हानी वगळता सुदैवाने या अपघातात कोणालाही हानी पोहोचली नाही. या मार्गावरून सध्या मालवाहू आणि अन्य वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात वाढलेली असून दिवसाला एक याप्रमाणे अपघात व्हायला लागले आहेत. काणकोणची पोलीस यंत्रणा त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस दिवसा वाहनांची गती तपासण्याचे काम करतात. पण बहुतेक अपघात रात्रीच्या वेळी घडलेले असून या मार्गावरून भरधाव वाहने हाकणे हेही यामागचे एक कारण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.









