वार्ताहर/काकती
बेळगावहून हिडकल डॅमकडे जाणाऱ्या एका सिल्हेरिया कारचा टायर अचानक फुटल्याने ती थेट रस्ता दुभाजकाला धडकली. ही घटना गुरुवारी 11 रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास होनगा प्रवेशद्वाराजवळील उड्डाणपूलजवळ घडली आहे. अपघातग्रस्त कारचे मोठे नुकसान झाले असून अपघात इतका भीषण होता की कारचालक श्रीधर रामपूर यांचा पाय कारमध्ये अडकून बसला होता. कारचालक बेळगावहून हिडकल डॅम या आपल्या गावी जात होता. भरधाव कारचा टायर फुटल्याने कार पश्चिमेकडील दुभाजकाला धडकली. लागलीच आजूबाजूच्या नागरिकांनी चालकाला सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातात चालकाशिवाय कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र कारचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस ठाण्याचे एसआय नागण्णावर यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची नोंद केली आहे. वाहनचालकाने वेगावर नियंत्रण गमावल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.










