चिपळूण :
चिपळूण–कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या भीषण अपघातात अकलूज येथील नायब तहसीलदार रवीकिरण रामकृष्ण कदम गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी बचाव कार्य राबवत त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना अधिक उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कदम हे त्याच्या खासगी कारने चिपळूण–कराड मार्गावरील कुंभार्ली घाटमार्गे चिपळूणच्या दिशेने येत होते. ते घाटातील एका अवघड वळणार आले असताना त्याची कार थेट खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कदम यांना या दरीतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी बचाव कार्य सुरु केले. पोलीस दोरखंड टाकून दरीत उतरले. यावेळी अपघाती कार दिसून आल्यानंतर त्या दिशेने पोलीस गेले असता त्यामध्ये कदम गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना बाहेर काढून कराड येथे उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी सामा†जक कार्यकर्ते अनंत साळवी, अन्य ग्रामस्थांनी मदत कार्य केले.
कुंभार्ली घाट अधिकच धोकादायक बनत चालला असून यापूर्वी देखील घाटात भीषण अपघात होऊन त्यामध्ये चिपळुणातील आई–मुलाला प्राण गमवावा लागला होता. याप्रश्नी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजनांकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.








