सुदैवाने चालक बचावला : शहर पोलिसांत घटनेची नोंद
प्रतिनिधी/ निपाणी
निपाणी महामार्गावर 30 छाप विडी कारखान्यानजीक रविवार 29 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात कार पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर कारचालक सुदैवाने बचावला आहे. अपघातात कारचे सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक ऊपयाचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेले माहिती अशी, कार क्रमांक एमएच 13 एझेड 6226 ही गडहिंग्लजहून कागलच्या दिशेने जात होती. दरम्यान, 30 छाप विडी कारखान्यानजीक कार आल्यानंतर अज्ञात ट्रकचालकाने वाहन बाजूला घेतले. त्यावेळी कारचालक जीवन गुडसे याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार दुभाजकाला धडकून विऊद्ध दिशेला जाऊन पलटी झाली. यात कारचालक सुदैवाने बचावला. परंतु अपघातात कारचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच अवताडे कंपनीचे सुपरवायझर व सहकाऱ्यांनी तसेच निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या हवालदार हेमलता नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चालक जीवन यास किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान, कार विऊद्ध दिशेला पलटी झाल्याने काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.









