वेळीच सावधानता बाळगल्याने चौघे जण बचावले
बेळगाव : आंबेवाडी क्रॉसजवळ धावत्या कारने पेट घेतल्याची घटना ताजी असतानाच पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बेन्नाळीजवळ बुधवारी रात्री दुसरी घटना घडली आहे. आगीच्या घटनेत कारचे नुकसान झाले असून सुदैवाने कारमधील कोणालाही इजा पोहोचली नाही. स्वीफ्ट कारमधून चौघेजण बेळगावहून अथणीला जात होते. बेन्नाळीजवळ पोहोचताच त्यांनी प्रवास करीत असलेल्या कारमध्ये धूर दिसून आला. त्यामुळे कार उभी करून चौघेजण खाली उतरले. बघता बघता कारने पेट घेतला. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काकती पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मात्र, कारचे नुकसान झाले आहे. यासंबंधी काकती पोलिसांशी संपर्क साधला असता कारमधील चौघेजण लगेच खाली उतरल्यामुळे अनर्थ टळल्याचे पोलिसांनी सांगितले.









